औरंगाबाद- कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मला लोकसभेसाठी एकदा संधी द्या अशा आशयाची जाहिरात वृत्तपत्रात दिलेली आहे. त्यात स्वतःला शूरवीर समजणारा नेता पक्षाच्या लांगूलचालनापायी स्वतःच्याच जातीच्या युवकांना बेदम चोप देतो अशी टिका दानवेंवर केली. त्यावर केवळ राजकीय स्वार्थासाठी मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणाऱ्यांनी मला जातीबद्ल ज्ञान शिकवू नये असा घणाघाती पलटवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आमदार जाधव यांच्यावर केला आहे.
कन्नड तालुक्याचे आमदार हर्षवर्धन जाधव हे नेहमीच जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिध्दीझोतात
येत असतात. मराठा आरणक्षणासाठी दिलेला राजीनामा स्विकारावा म्हणून आमदार जाधव यांनी
यायाधी जाहिरात दिली होती. आता त्यांनी लोकसभेसाठी मला एकदा निवडून द्या, चमत्कार
करुन दाखवेन अशी जाहिरात दिलेली आहे. यात त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे
यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे.
मराठा आरक्षणाच्या एका आंदोलनादरम्यान उध्दव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी
केली म्हणून अंबादास दानवे यांनी मराठा समाजाच्या युवकांना मारहाण केली होती.
त्यांनतर दानवेंविरोधात संतापाची लाट पसरली होती. त्याच घटनेचा दाखला देत, आमदार
जाधव यांनी फक्त पक्षाच्या नेत्यांची मर्जी
राखण्यासाठी स्वतःच्याच जातीच्या युवकांना मारहाण करतो अशी टीका दानवे यांच्यावर केली. त्यावर सांजवार्ता
ऑनलाईनशी बोलतांना दानवे म्हणाले की मी हर्षवर्धन जाधवांना महत्व देत नाही. केवळ राजकीय
स्वार्थासाठी मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणाऱ्या जाधवांनी मला जातीबद्दलचे ज्ञान
शिकवू नये असे प्रतिउत्तर जाधवांच्या टीकेला दिले.