छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : छत्रपती संभाजीनगर परभणी या विशेष रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे परंतू संबंधित अधिसूचनांमध्ये सुस्पष्ट माहिती नसल्याने करमाडसह परिसरातील गावांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
कोणत्या गट क्रमांकातील किती भूभागाचे अधिग्रहण होणार, कोणत्या घरांचा समावेश आहे, याबाबत स्पष्ट माहिती न देण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि तणाव वाढला आहे.
रेल्वे मार्ग दुहेरीकरणालाही वेग देण्यात आला आहे. या अनुषंगाने करमाड ते शेकटा सीमाभागापर्यंत जमीन संपादनाची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. करमाड परिसरातील देमणी १.७६, वरुड काजी ०.३१, चिकलठाणा २.३९ गाडेजळगाव १.८३, करजगाव ०.४२, करमाड २.५५, हसनाबादवाडी २.१९, शेंद्रा जहांगीर २.१७, शेकटा २.०४, लाडगाव ०.३४ व कुंभेफळ ०.१३ हेक्टर अशा मिळून एकूण १६ हेक्टर १३ आर जमीन संपादित होणार आहे. ग्रामीण भागातील तब्बल १८७० मालमत्ता बाधित होणार असल्याचेही नमूद आहे.
अधिसूचना प्रसिद्ध झाली असली तरी ती सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरूपात स्थानिक
पातळीवर उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. दुहेरीकरणामुळे निवासस्थान, दैनंदिन जीवन, व्यवसाय, सुरक्षितता आणि सामाजिक आयुष्य यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या बाबी लक्षात घेता बाधित नागरिकांना मार्गदर्शन, भरपाईची माहिती आणि आक्षेप नोंदविण्याची प्रक्रिया स्पष्टपणे कळणे अत्यावश्यक आहे. यासाठी रेल्वे व भूसंपादन विभागाने पुढाकार घेण्याची तातडीची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.











