मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे २०२९ मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान व्हायची तयारी करत आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाचे सहा खासदार हे थेट भाजपमध्ये न जाता शिंदे गटात गेले. या सगळ्यामागे अमित शाह यांना पंतप्रधान करण्याच्यादृष्टीने रणनीती आखण्यात आल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना २०२९ च्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यादृष्टीने मतदार यादी आणि इतर बाबींवर लक्ष ठेवा, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्या.
यावेळी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरसंदर्भातही भाष्य केले. अमित शाह यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनीऑपरेशन टायगर राबवले होते. त्यानुसार ठाकरे गटातील संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि नागेश आष्टीकर पाटील या सहा खासदारांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले होते. या सगळ्या घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी एका वेगळ्याच पैलूकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी म्हटले की, ठाकरे गटाचे जे खासदार फुटले, त्याबाबत माझा एक प्रश्न आहे. केंद्रात सत्ता कोणाची ? भारतात सत्ता कोणाची ? भाजपची ना, मग हे ६ खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले? यामागे एक कारण आहे. २०२९ मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. अन्यथा हे ६ खासदार भाजपमध्ये गेले असते, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
सध्याच्या घडीला भाजपमध्ये अंतर्गत ज्वालामुखी खदखदत आहे. आतून सगळं पेटलेलं आहे. नरेंद्र मोदी असल्यामुळे सध्या सगळं शांत आहे. पण काहीजण बोलत आहेत की, येत्या काही दिवसांमध्ये केंद्रात आणि अनेक ठिकाणी गोंधळ होईल. त्यामुळे तयार व्हा, ज्यावेळी वेळ येईल तेव्हा तुम्ही जमिनीत पाय रोवून उभे राहिले पाहिजे, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला.