कोरोना आढावा बैठकीला शहरातील लोकप्रतिनिधींना का बोलावले नाही ? असा सवाल करीत आ.अतुल सावे आज चांगलेच भडकले. पालकमंत्री देसाई यांना शिवसेनेच्याच आमदारांवर विश्वास नाही का ? असा परखड सवालही आमदार सावे यांनी उपस्थित केला आहे.
शहरात कडक लॉक डाऊन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी शहरातील लोकप्रतिनिधींना बोलावले नव्हते. यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आमचेही काही मुद्दे विचारात घेतले असते तर बरे झाले असते ? असे आ. अतुल सावे यांनी सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले.
सावे म्हणाले, पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला किमान शहरातील लोकप्रतिनिधींना तरी बोलवायला हवे होते. यापूर्वी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे यावेळी आम्हाला आमंत्रित केले जाईल, अशी अपेक्षा होती. शहरासाठीच्या उपाययोजनांबाबत आमचेही काही मुद्दे प्रशासनासमोर या बैठकीत मांडण्यात आले असते. मात्र ती संधी आम्हाला दिली गेली नाही.
शहरात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यांना तरी या बैठकीला बोलवायला हवे होते. मात्र त्यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांना आता आपल्याच आमदारांवर विश्वास राहिला नाही का ? असा सवाल आ. सावे यांनी उपस्थित केला आहे.











