औरंगाबाद: प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शहरी मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून, ग्रामीण भागात अद्यापही प्रचाराचा फारसा जोर दिसून येत नाही. जिल्ह्यातील निम्मे मतदार संख्या असलेल्या शहरात प्रचाराचा धुरळा उडत आहे. उष्णतेच्या तडाख्यात शहरातील प्रचार अधिक सोपा असल्याने कार्यकर्तेही अद्याप शहराबाहेर पडले नाहीत. जिल्ह्यात नऊ लाखांवर मतदारसंख्या औरंगाबाद शहरात असून, आठ लाखांहून अधिक मतदार ग्रामीण भागातील आहेत. अशा परिस्थितीत शहरी मतदारच निवडणुकीचे चित्र पालटू शकतो याचा अंदाज राजकीय पक्षांना आला आहे. त्यामुळे शहरातील मतदारांवर प्रमुख उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
दुसरीकडे शहरातील मतदार आता धार्मिकतेऐवजी विकास आणि शहरातील प्रश्नांनाच प्राधान्य देताना दिसतात. या संधीचा फायदा काँग्रेससह एमआयएम आणि शिवस्वराज्य बहुजन पक्ष उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारण्याची तयारी या पक्षांनी केली आहे. दररोज काँग्रेस, एमआयएम आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षांच्या रॅली, मिरवणुका निघत आहेत. त्या मानाने ग्रामीण भागाकडे या पक्षांचे फारसे लक्ष नाही. उष्णतेची लाट हेही एक कारण ग्रामीण भागात प्रचार थंडावण्याचे दिसून येते. शहरात मात्र वातावरण निर्मितीला जोर आला आहे. शहरातील कचरा व पाणीप्रश्नाचे खापर खैरेंवर फोडताना मतदार विरोधी पक्षांपैकी कुणाच्या पारड्यात मत टाकतात याचा अंदाज अद्यापही आलेला नाही. मध्य मतदारसंघात एमआयएमचा जोर चालणार असे दिसते. पूर्व मतदारसंघातून एमआयएमला चांगले मताधिक्य अपेक्षित आहे. सेनेने पश्चिम, सातारा, देवळाई, सिडको-हडको या भागावर लक्ष केंद्रित केले असून, काँग्रेसने एमआयएमचा गड असलेल्या मध्यमध्ये जोर लावल्याचे दिसते. काँग्रेस, राष्ट्रवादी महआघाडीचे उमेदवार आ.सुभाष झांबड हे मुस्लिम मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न करीत आहेत.
आ. हर्षवर्धन जाधव यांनाही मुस्लिम मतदार साथ देतील, अशी आशा आहे. या निवडणुकीत दलित-मुस्लिम मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एमआयएमवरही अनेक मुस्लिम नेते नाराज आहेत. त्यांची नाराजी आ. इम्तियाज जलील कशी दूर करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दलित मतदार वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. मात्र, एमआयएमच्या उमेदवाराला दलित समाज मतदान करेल का? अशीही शंका उपस्थित होत आहे.
दुसरीकडे शिवसेना-काँग्रेस असा सामना खासदार खैरे यांना परवडणारा नाही. त्यामुळे खा.खैरे यांचा उद्देश एमआयएमसोबत लढत व्हावी, असाच आहे. एमआयएम मात्र कट्टर भूमिका घेण्यास तयार नाही. त्यामुळे सध्या तरी शिवसेनेत चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेस-एमआयएमच्या मत विभागणीत आपला फायदा होईल का, असे गणित सेना मांडताना दिसते, तर हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकात खैरे यांच्यातील मतविभागणीत आ.झांबड यांना भविष्य दिसत आहे. अनेक जण तर आ.झांबड, आ. जाधव आणि खा.खैरे यांच्या मतविभागणीत एमआयएमचा हुकमी एक्का चालू शकतो, असाही अंदाज वर्तवत आहेत.
सेनेला ग्रामीण भागातून आशा
शिवसेनेने ग्रामीण भागावर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. खा. चंद्रकांत खैरे यांनी कन्नडसह वैजापूर तालुका पिंजून काढला आहे. आता गंगापूर, फुलंब्री तालुक्यात त्यांच्या सभा होणार आहेत. नाराज शहरी मतदारांची कसर ग्रामीण भागातून भरून काढण्यावर शिवसेनेने लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. त्यामुळेच सेनेचे कार्यकर्ते ग्रामीण भागात पोहोचले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सेनेने ग्रामीण भागात दस्तक दिली. त्या मानाने काँग्रेस आणि एमआयएम अजून ग्रामीण भागापर्यंत फारसे पोहोचले नाहीत. शिवस्वराज्य बहुजन पक्षाने कन्नडसह गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात प्रचाराची यंत्रणा मजबूत केली आहे. शहरातील अधिकाधिक मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न या पक्षाचे आ.हर्षवर्धन जाधव करीत आहेत. त्यामुळे शहरातील मतदान चार ठिकाणी विभाजित होईल, असे दिसते.