फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजात पशू-पक्ष्यांना जपण्याचे आवाहन

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दिवाळीचा आनंदोत्सव सर्वत्र सुरू असताना, दुसरीकडे फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे मुक्या प्राणी व पक्ष्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, फटाक्यांचा अनावश्यक आवाज टाळून सण साजरा करण्याचे आवाहन लाइफ केअर अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनने केले आहे.
दिवाळीच्या काळात शहरातील पाळीव व भटक्या प्राण्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. फटाक्यांच्या तीव्र आवाजामुळे कुत्रे, मांजरे, गायी आणि पक्षी अत्यंत भयभीत होतात. अनेकदा घाबरून सैरभैर पळताना त्यांचे अपघात होतात. या संदर्भात संस्थेचे जयेश शिंदे यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. घराजवळ किंवा घराबाहेर फटाके फोडताना पाळीव प्राण्यांना सुरक्षित व शांत ठिकाणी ठेवावे आणि त्यांना विनाकारण मोकळे सोडू नये. तसेच फटाक्यांचा कचरा व जळलेले अवशेष प्राण्यांपासून दूर ठेवावेत, जेणेकरून विषबाधा किंवा इजा होणार नाही. फटाक्यांमुळे घाबरलेल्या अथवा भाजून जखमी झालेल्या प्राण्यांना तत्काळ वैद्यकीय मदत द्यावी, असेही त्यांनी नमूद केले. आपला आनंद साजरा करताना मुक्या प्राण्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.