छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज क्रांती चौक येथे अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाला. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती या घोषणांनी सकाळपासूनच संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवगर्जना, ढोल-ताशांचा गजर आणि भगव्या झेंड्यांची लहर यामुळे चौकात शिवभक्तीचा महासागर उसळल्याचे चित्र दिसून आले.
सकाळी ७ वाजल्यापासून विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला मंडळे, व्यापारी संघटना तसेच शेकडो शिवप्रेमी क्रांती चौकात एकत्र जमू लागले. चौकात आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या तोरणांनी आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांनी यावेळी छत्रपतींना मानवंदना दिली. यावेळी सामाजिक राजकीय, शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाठ, मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केनेकर, अनिल मकरिये, किशोर शितोळे, महापौर समीर राजूरकर, राजेंद्र दाते पाटील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नगरसेविका हर्षदा शिरसाठ, शंकर म्हात्रे, हरीश शिंदे, संदीप शेळके, विशाल दाभाडे, मनीषा भन्साळी, डॉ. उज्ज्वला दहिफळे, मनसुख झाम्बड, पृथ्वीराज पवार, नंदू गवळी, प्रा. चंद्रकांत भराड, वाल्मिक सुरासे, अशोक तेजनकर, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी श्रीकांत, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर सह आदी मान्यवरांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. तसेच यावेळी स्नेहबंधन प्रतिष्ठानतर्फे यावेळी तीन क्विंटल पोहे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी अध्यक्ष रंगनाथ जाधव, वैजनाथ जमे, अनिल सूर्यवंशी सह आदींनी सहकार्य केले. याशिवाय शिवचरित्र पारायणाची छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून सांगता करण्यात आले. यावेळी नवीन छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघ शिवजयंती महोत्सवाच्या वतीने गजानन महाराज मंदिर परिसर ते पुंडलिकनगर मार्गे बाईक रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष बबन डीडोरे पाटील, अध्यक्ष ज्योतिराम पाटील सह आदींनी सहकार्य केले. तसेच हेलिकॉप्टरद्वारे शिवजयंती निमित्ताने क्रांती चौक येथे पुष्पवृष्टी करण्यात आली.
सामूहिक आरतीने दणाणला चौक
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे सामूहिक आरती. हजारो शिवभक्तांनी एकसुरात आरती म्हणत जय भवानी, जय शिवाजीचा निनाद केला. आरतीच्या स्वरांनी आणि घोषणांनी संपूर्ण क्रांती चौक अक्षरशः दणाणून गेला. वातावरणात भक्तीभाव आणि अभिमानाची भावना दाटून आली. अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाश्रू तरळताना दिसत होते. यावेळी तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवे फेटे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून तरुणाईने चौकात वेगळेच आकर्षण निर्माण केले. ढोल-ताशा पथकांनी शिवकालीन युद्धघोषांसह वातावरणात ऊर्जा निर्माण केली. काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे नाट्यरूप सादरीकरण केले. लहान मुलांनी शिवराय, मावळे, जिजाऊ यांच्या वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी टाळ, मृदंगच्या गजरात यावेळी वारकरी संप्रदायाचे महत्व पटवून दिले.
संदीप भुसारे यांच्या वेशभूषेने वेधले लक्ष
शिवजयंती निमित्ताने आज सकाळी घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारून संदीप भुसारे यांनी शानदान क्रांती चौक येथे प्रवेश करताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष तर वेधलेच याशिवाय सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी केली.
विचाराचा वारसा जपण्याचा निर्धार
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, प्रशासन कौशल्य आणि लोककल्याणकारी धोरणांची माहिती दिली. स्वराज्य, स्वाभिमान आणि स्त्रीसन्मान या मूल्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. छत्रपतींचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजही मार्गदर्शक आहेत, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. या उत्सवातून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत ऐक्य आणि एकात्मतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त क्रांती चौक अक्षरशः शिवमय झाला. घोषणांचा निनाद, भगव्या झेंड्यांची पताका आणि आरतीचा गजर यामुळे संपूर्ण परिसरात शिवभक्तीचा उत्साह दरवळला.












