औरंगाबाद: पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात एकत्र आलेले शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांची गळाभेट होता होता टळली. उपस्थितांच्या खिळलेल्या नजरा आणि लुकलुकणारे कॅमेरे पाहून दोघांनीही सावध होत केवळ हस्तांदोलन केले. लोकसभा निवडणुकीत खान की बाण अशा टोकदार प्रचाराने एकमेकांविरुद्ध लढलेले खासदार चंद्रकांत खैरे आणि आ. इम्तियाज जलील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रथमच एकत्र आले. प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकावर टीकेचे बाण सोडत शाब्दिक हल्ला चढवलेल्या या दोन नेत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमात पहिल्याच रांगेतील आसनावर आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले यांच्या शेजारी खासदार चंद्रकांत खैरे स्थानापन्न झाले होते. तेवढ्यात इम्तियाज जलिल यांचे आगमन झाले. खैरे यांना पाहून जलील त्यांच्याकडे सरसावले. खासदार खैरेही लगबगीने आसनावरून उठले. दोघेही एकमेकांजवळ उपस्थितांच्या नजरा या दोघांवर खेळल्या होत्या. त्याच बरोबर पत्रकार तसेच छायाचित्रकारांचे लक्षही या दोन नेत्यांकडेच होते. चाणाक्ष खैरे यांच्या ही बाब लक्षात आली. उगीच चर्चा नको असा विचार त्यांनी केला असावा. त्यामुळेच गळाभेटीसाठी सरसावलेले हे दोन्ही नेते हे अचानक सावध झाले. केवळ हस्तांदोलन करीत आपापल्या आसनावर जाऊन बसले. हा प्रसंग मात्र अनेकांनी टिपला. राजकीय अभिनिवेश बाजूला सारत सार्वजनिक ठिकाणी एकत्र आलेल्या या दोन्ही नेत्यांची देह बोली अगदीच सामान्य होती. राजकीय क्षेत्रातील कट्टर विरोधी आणि कायम एकमेकावर तोंडसुख घेणारे हे दोन्ही नेते आता काय बोलतात, याकडे लक्ष लागलेल्याची मात्र पार निराशा झाली. दोघांतही फारसा संवाद झाला नाही. या दोघांवर खिळलेल्या उपस्थितांच्या नजरा अन कॅमेऱ्याचा लुकलुकाट यामुळेच खैरे-जलील यांची गळा भेट होऊ शकली नाही, अशी चर्चा यावेळी रंगली होती.