आनंदराज आंबेडकरांनी औरंगाबादेतून निवडणूकीच्या आखाड्यात उतरावे ; रिपब्लिकन सेनेच्या बैठकीत सूर

Foto
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आनंदराज आंबेडकर यांनी उतरावे, अशी इच्छा रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यांना विविध स्तरातून पाठिंबा आणि मत मिळण्यासाठी आता कार्यकर्ते कंबर कसणार आहे. सुभेदारी विश्रामगृहात रिपब्लिकन सेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या झालेल्या  बैठकित हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते दादाराव राऊत हे होते. प्रारंभी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी चळवळीचा सक्षम उमेदवार कोण असेल अशी चर्चा होताच आनंदराज आंबेडकर यांचे नाव समोर आले. त्यांनी औरंगाबाद येथून निवडणूक लढवावी म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच आनंदराज आंबेडकर यांची भेट घेऊन आंबेडकरी जनतेचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरणार आहेत.  बैठकीस जिल्हा निमंत्रक रुपचंद गाडेकर, काकासाहेब गायकवाड, महिला आघाडीच्या शांता धुळे, मिलिंद बनसोडे, सचिन निकम, चंद्रकांत रुपेकर, विजय शिंगारे, अ‍ॅड.अतुल कांबळे, आदींची उपस्थिती होती.

दोन महिन्यांपासून संपर्क अभियान
मागील दोन महिन्यांपासून रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी विविध समाज, वयोगट, विधानसभा मतदार संघ निहाय संपर्क अभियान राबविण्यात आले. त्यात आनंदराज आंबेडकर यांच्या नावास मतदारांनी मोठा पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्या उमेदवारीने दलित, मुस्लिम, बहुजनांची या माध्यमातून एकजूट दिसून येईल असा विश्वास या संवाद अभियानात नागरिकांनी व्यक्त केला आहे.

तर होऊ शकते आंबेडकरी मतदारांची एकजूट 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मराठवाडा, विदर्भातील गोरगरीब जनतेला शिक्षनाचे द्वार खुले करून दिले. औरंगाबाद हा आंबेडकरी चळवळीचा जिल्हा म्हणून भारतभर ओळखला जातो. नामांतर चळवळीमुळे अनेक कार्यकर्ते होरपळून निघाले आहेत. आंबेडकरी चळवळ ही गटातटात विभागलेली असल्याने लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी हा आग्रह आहे. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या भूमीत बाबासाहेबांचा नातू निवडणूक लढवणार असेल, तर त्याला सर्व समाज घटकातून मोठा पाठिंबा राहु शकतो. आनंदराज आंबेडकर यांच्या माध्यमातून एक प्रबळ उमेदवार मिळाल्यास आंबेडकरी मतदारांची एकजूट दिसून येऊ शकते.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत करणार चर्चा
रिपब्लिकन सेनेने यापूर्वीच ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी सोबत असल्याचे जाहीर केले आहे. बहुजन नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर आनंदराज आंबेडकर यांना औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील उमेदवारास म्हणून पाठिंबा द्यावा यासाठी आघाडीच्या नेत्यांची कार्यकर्ते भेट घेणार आहेत. 

 विजयाचा कार्यकर्त्यांना विश्वास
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात बौद्ध, दलित, मुस्लिम व बहुजन वर्गाचे प्राबल्य आहे. १९९६ मध्ये डॉ. अविनाश डोळस यांनी लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत चांगली मते मिळविली होती.  आंबेडकरी चळवळीचा उमेदवार दलित, मुस्लिम, बहुजन एकजुटीच्या जोरावर येथून विजयी होऊ शकतो असा विश्वास कार्यकर्त्यांचा आहे. आनंदराज आंबेडकर यांनी येथून निवडणूक लढविल्यास मराठवाड्यातील रिपब्लिकन चळवळीला गती मिळून आंबेडकरी मतदारांना विश्वास देण्याचं महत्वपूर्ण काम या माध्यमातून होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker