औरंगाबाद : सध्या लग्नसराई आणि सुट्यांमुळे एस.टी.महामंडळाच्या चालक-वाहकांना सुट्या दिल्या जात नाहीत. पण भावाचा मृत्यू झाल्यानंतरही महामंडळातील अधिकार्याने तुम्ही खोटे बोलता असे म्हटल्याने चालकाने चक्क भावाचे शव असलेली अॅम्बुलन्स घेऊनच आगार गाठल्याने एकच खळबळ उडाली.
महामंडळाच्या माणुसकीशून्य कारभारामुळे कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.सध्या लग्नसराईमुळे तसेच उन्हाळी सुट्या लागल्याने प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या बसेसला जास्त मागणी आहे. बसेसच्या फेर्या वाढविण्यात आली. याचा परिणाम थेट कर्मचार्यांच्या कामावर होत आहे. क र्मचार्यांना सुटी मिळण्यात अडचणी येत आहेत. आज मंगळवारी एस.टी.चे चालक तेजराव सोनवणे (रा. लोणी, ता. रिसोड, जि. वाशिम) यांच्या भावाचे निधन झाले. यापूर्वी गेल्या आठवड्यात त्यांचा भाच्चा मरण पावला. नंतर वरिष्ठांनी तो खरेच वारला का, याची शहानिशा केली. आज सकाळी सोनवणे यांच्या बंधूचे घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. भावाच्या मृत्यूबाबत वरिष्ठांकडून पुन्हा विचारणा होऊ नये म्हणून सोनवणे हे भावाचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन थेट सिडको आगारात दाखल झाले. तेथून आपली बॅग व इतर साहित्य घेऊन ते आपल्या गावाकडे रवाना झाले. दरम्यान, आज सोनवणे यांची साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे त्यांना सुटी न देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ते त्यांची बॅग घेण्यासाठी सिडको आगारात आले होते. पुढील सुटीसाठी त्यांचा सुटीचा अर्ज मंजूर करण्यात आला असल्याची माहिती एस.टी. महामंडळाच्या अधिकार्यांनी दिली .