नवी दिल्ली: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी केल्यास लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास उशीर होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला दिली. आयोगाने याबद्दलच्या व्यवहार्यतेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणार्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. किमान 50 टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांनी याचिकेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणात सक्षम कर्मचारी वर्ग आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. यासाठी मोठ्या सभागृहाची आवश्यकता भासेल. अनेक राज्यांमध्ये आधीच मोठ्या सभागृहांचा प्रश्न आहे, अशा समस्या आयोगाने न्यायालयाला सांगितल्या. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचे प्रमाण 50 टक्क्यांवर नेण्याची मागणी मान्य झाल्यास निवडणुकीला निकाल 5 दिवस उशिरा म्हणजेच 23 मे रोजी 28 मे रोजी लागेल, असे आयोगाने न्यायालयाला सांगितले.