शासकीय विभागीय ग्रंथालयात लेखन प्रेरणा
दिनानिमित्त व्याख्यान, ग्रंथप्रदर्शन
खुलताबाद, (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून उपेक्षित आणि वंचित घटकांच्या व्यथा वेदना अत्यंत तीव्रतेने मांडल्या. ते एक प्रतिभावंत साहित्यिक, शाहीर आणि अद्वितीय कलावंत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला अण्णाभाऊंच्या शाहिरीने मोठी स्फूर्ती दिली, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कोंडबा हाटकर यांनी काढले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित "लेखन प्रेरणा दिना"च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम शासकीय विभागीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय आणि मॉडर्न संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विभागीय ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे होते तर मॉडर्न कॉलेज प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कोंडबा हाटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांची उपस्थिती होती. आंबेडकर-अण्णाभाऊंमधील ऋणानुबंधाला उजाळा आपल्या भाषणात डॉ. हाटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्यातील वैचारिक नाते उलगडून दाखवले. "अण्णाभाऊंनी आपली प्रसिद्ध फकिरा ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी अण्णाभाऊंनी जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव हे प्रसिद्ध विधान करून बाबासाहेबांप्रती आपला आदर व्यक्त केला होता.
डॉ. कोंडबा हाटकर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. नामदेव सानप यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिभेचा गौरव करत त्यांचे साहित्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात सुनील हुसे यांनी अण्णाभाऊंचे साहित्य सकस व आशयघन असल्याचे सांगत आजच्या तरुण पिढीने त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करावा, असे आवाहन केले. ग्रंथप्रदर्शन आठवडाभर खुले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले.
सूत्रसंचालन अनिल बाविस्कर यांनी, तर उपस्थितांचे आभार तांत्रिक सहाय्यक गोविंद खेडकर यांनी मानले. या प्रसंगी ग्रंथालयाचे वाचक, सभासद, कर्मचारी, मॉडर्न कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांना आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयात भरवण्यात आलेले हे ग्रंथप्रदर्शन पुढील आठवड्याभरासाठी कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या ग्रंथप्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी आणि ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.














