अखेर अन्नामलाईंचा राजीनामा मंजूर! भाजप श्रेष्ठींचे प्रयत्न अयशस्वी; प्राथमिक सदस्यत्वही सोडले...

Foto
चेन्नई : दाक्षिणात्य राजकारणात भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा मानले जाणारे तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. अन्नामलाई यांनी केवळ अध्यक्षपदच नव्हे, तर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून पक्षाने तो मंजूर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अन्नामलाई यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.

दरम्यान भाजपामधून तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर के. अन्नामलाई यांनी तामिळनाडूच्या राजकारणात एकच खळबळजनक घोषणा केली. आज आम्ही एका नवीन आंदोलनाची सुरुवात करत आहोत. आमचा राजकीय पक्ष तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढेल, असे विधान अन्नामलाई यांनी केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, के. अन्नामलाई आता भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्यही राहिलेले नाहीत.
दिल्ली विमानतळावरून अन्नामलाईंना बोलावले मागे

हा राजीनामा मंजूर होण्यापूर्वी दिल्लीत भाजपच्या शीर्ष नेत्यांमध्ये प्रचंड खलबते आणि हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अन्नामलाई यांनी २ जून रोजी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेऊन ५ पानांचे राजीनामा पत्र सुपूर्द केले होते. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक अत्यंत गोपनीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात पक्ष सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.