छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमच्या प्रचार रॅलीत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणातील संशयित हल्लेखोर आरोपी शेख नईम कुरेशी शेख छोटू कुरेशी, साजीद कुरेशी शरीफ कुरेशी आणि साहील कलीम कुरेशी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी मंगळवारी (दि.२७) फेटाळले.
महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ७ जानेवारीला बायजीपुरा ते नवाबपुरा भागात प्रचार रॅली काढली होती. उमेदवार फेरोज खान, मुन्शी भिकन शेख आणि अल्मास अमजद खान यांच्यासह शंभर ते दीडशे लोक रॅलीत सहभागी झाले होते. रॅली बशीर लॉन्सजवळ आली असता आरोपी कलीम, हबीब, शकील, आवेज व इतरांनी घोषणाबाजी करीत रॅलीवर आणि पोलिसांवर अंडी फेकली. रॅली अडवून गोंधळ घातला. तसेच इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. जमावाने वाहनांची तोडफोड, दगडफेक, लाकडी दांडके व शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तथा सरकारी वकील राजू पहाडिया यांनी त्यांच्या जामीन अर्जाना विरोध केला. हल्यामागील आरोपींचा उद्देश काय होता, याचा शोध घेऊन शस्त्र जप्त करणे जरूरी आहे. आरोपींच्या पोलिस कोठडीशिवाय हे शक्य नाही, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने आरोपोंचे जामीन अर्ज नामंजूर केले.











