औरंगाबाद - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला तर फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर लढण्यास आपण इच्छूक असल्याचे अनुराधा चव्हाण यांनी म्हटले आहे. मतदारसंघात नाना म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिभाऊ बागडेंच्या ‘ना’वर आता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या अनुराधा चव्हाण यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
काँग्रेसच्या
ताब्यातून पटकावला फुलंब्री मतदारसंघ
काँग्रेसचे कल्याण काळे यांच्या पराभव करत हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री मतदार संघावर
भाजपचा झेंडा फडकवला आहे. मोदी लाटेत नानांचा नंबर लागला असा आरोप काँग्रेस करत
आली आहे. आमदार झाल्यानंतर हरिभाऊ बागडेंची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाली
असली तरी मतदारसंघातील त्यांचा संपर्क कमी झाला नाही.
या मतदार संघातून नानांच्या विरोधात लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा
चव्हाण यांनी वाऱ्याची दिशा ओळखत भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणूक डोळ्यासमोर
ठेवून त्यांनी प्रवेश केला असला तरी त्यांचे राजकीय भवितव्य हे हरिभाऊ बागडेंच्या
होकार किंवा नकारावर अवलंबून आहे.
अनुराधा चव्हाणांची मतदारसंघात जोमात तयारी
राष्ट्रवादी
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अनुराधा चव्हाण यांनी मतदारसंघात संपर्क अभियान
सुरु केले आहे. दिवाळी पहाटच्या निमित्ताने त्यांनी सारेगमप फेम कार्तिकी गायकवाड
हिच्या गाण्याचा की "स्वरानुभूती" या कार्यक्रमाचे औरंगाबाद पूर्व मतदार
संघात आयोजन केले होते. हा भाग फुलंब्री मतदार संघाजवळ आणि औरंगाबाद-जालना मतदार
संघात येत असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि फुलंब्री मतदारसंघाचे
आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मनधरणी
करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने त्यांनी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनुराध चव्हाण
या गणोरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. भाजपातील महिला आघाडीची पीछेहाट
झाल्याने महिला आघाडीला आणखी सक्षम, कृतिशील बनविण्यासाठी चव्हाण यांना महिला आघाडीच्या प्रभारी पदाची सूत्रे बहाल
करण्यात आली. महिला आघाडीत ऊर्जा आणण्यासाठी दिवाळी पहाटच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम खास
भाजपातील पदाधिकाऱ्यांकरीता आयोजित करण्यात आला होता
बागडे, दानवेंची मर्जी संभाळण्याचा प्रयत्न
आगामी निवडणूक
डोळ्यासमोर ठेवून अनुराधा अतुल चव्हाण यांनी पक्षातील दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न या
कार्यक्रमाच्या निमित्ताने केला. पक्षात आपले वजन वाढावे आणि आपले नेतृत्व सिद्ध
व्हावे यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांचा फुलंब्री मतदार संघ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा
जालना-औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आपली पकड मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न
असल्याची चर्चा आहे. पक्षातील दोन्ही नेत्यांना दिवाळी पहाट कार्यक्रमनिमित्ताने
एकाच व्यासपीठावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे दोन्ही नेते कार्क्रमात एकमेकांसमोर आले नसले तरी
त्यांनी आपापल्या वेळेनुसार आवर्जून हजेरी लावली होती. हे नेते एकत्र का आले नाहीत
अशी चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली होती.












