जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, तो नेता 2029 ला निवडून येऊ द्यायचा नाही; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

Foto
बीड : मी तीन वर्षाच्या काळात कुणालाही स्वत:हून बोललेलो नाही. जो जो नेता, जो पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, तो नेता 2029 ला निवडून येऊ द्यायचा नाही, असे म्हणत जरांगे पाटलांनी बीडमधील नारायणगडावरुन राजकीय नेत्यांना थेट इशारा दिला. नारायण गडावर आज मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होत असून दुसरीकडे पाथर्डीतील भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे, बीड जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जो आपल्यासाठी नाही, तो आपला नाही, 2029 साठी सगळे तयार आहेत का? असे म्हणत जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना आवाहन केले. 

समाजाचं दुख: एकायचं शिका, ऊन, वारा, पाऊस कशासाठी सहन करतो. गेल्या तीन वर्षांपासून समाज संघर्ष करतोय. समाज आणि समाजाची लेकरं बाळं महत्वाची आहेत. समाज उन्हा तान्हात झटतोय, भान ठेवायचं शिका. पक्ष आणि नेता मोठा करण्यासाठी लोकांचा जीव जातोय. कोणत्याही पक्षातील मराठा नेता असू द्या त्याच्यावर संकट आलं तर समाज त्यांच्यावर पांघरुण टाकतो, असे म्हणत जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांनाही आपल्या भाषणातून लक्ष्य केलं. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या तरी अर्ज स्विकारला जात नाही, प्रमाणपत्र देत नाहीत. व्हॅलिडीटी प्रमाणपत्र देत नाहीत. एसीबीसीचं आरक्षण देत नाहीत, कोणता अधिकारी देत नाही ते बघतोच आता, असे म्हणत जरांगे पाटलांनी नारायण गडावरुन सरकारला इशारा दिला. मी शब्दाला पक्का आहे, तीन महिने तुम्हाला काही बोलत नाही म्हणालो. तुम्हाला कुठे जायचं नाही आणि मलाही नाही. आपण त्यांना शब्द दिलाय. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करू, तीन महिन्यांमधील एक महिना गेला, असेही त्यांनी म्हटले. 

तुमच्या नेत्यांवरील प्रेम बास करा
नुसती गर्दी भागणार नाही, त्यांना वाटत होतं आम्ही, म्हणजे आम्ही सगळे तुमच्या जिवावर आहोत का? असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे, भानावर या, तुमच्या नेत्यांवरील प्रेम बास करा. किती दिवस त्यांचा उधो उधो करणार तुम्ही. 80 टक्के शेतकरी आहे, शेतीत पिकलं नाही तर तो जगूच शकत नाही. जर तुमच्या घरात एखादा नोकरीवर असता तर पोरगं आम्हाला पैसे पाठवून देईल. पण आहे का आधार, तशी स्थिती नाही, असे म्हणत दुष्काळामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाल्याकडे जरांगे पाटलांनी लक्ष्य वेधले.