पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या च्या पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी दुसर्यांदा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर येत आहे. त्यानंतर रोहित पवारांनी एमपीएससीच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांच्याकडून आंदोलन केलं जाणार आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी ही मागणी या आंदोलनात प्रामुख्याने असणार आहे. एमपीएससीने तत्काळ सर्व रिक्तपदांवर भरती करून घेण्यात यावी ही मागणी आंदोलनात असणार आहे. मागच्या वेळी रोहित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती. परंतु या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्याने रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.