आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी मतदारसंघातील विविध रुग्णालयांसाठी आवश्यक कर्मचारी भरती व पदनिर्मितीची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी आवश्यक पदनिर्मितीस मंजुरी देणारा शासन निर्णय जाहीर करण्यात आला.
या निर्णयामध्ये सिल्लोड, सोयगाव व अजिंठा येथील उपजिल्हा रुग्णालयांसह भराडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सिसारखेडा आरोग्य उपकेंद्राचा समावेश करण्यात आला आहे. मागील महिन्यात ६ मे रोजी मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील विविध समस्या व प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा केला होता.
त्यानुसार या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी सदरील विषय तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुषंगाने बुधवारी (दि. २४) जून हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संबंधित आरोग्य संस्थांमध्ये डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे निर्माण होऊन भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, तत्पर व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.
विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार मांडली होती. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळाले असून शासनाच्या निर्णयामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. या निर्णयामुळे मतदारसंघातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाला मोठी मदत होणार असून, आमदार अब्दुल सत्तार यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले आहेत.














