भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते तथा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात मनोमिलन झाल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काल जाहीर केले असले तरी खोतकर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आज खोतकर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, त्यानंतरच खोतकर हे खा. दानवे यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढविणार की नाही, हे स्पष्ट होईल.
गेल्या काही दिवसांपासून खा. दानवे व खोतकर यांच्यात वाद सुरू आहे. भाजप-शिवसेना युती झाली असली तरी आपण जालना मतदारसंघातून खा. दानवे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार खोतकर यांनी व्यक्त केला होता. खोतकर यांनी दानवे यांच्याविरुद्ध शड्डू ठोकल्यामुळे दानवे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे टाकले होते. या दोन्ही नेत्यांतील वाद मिटविण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत: पुढाकार घ्यावा लागला. मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी जालना येथे खोतकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी खोतकर-दानवे व देशमुख यांची जवळपास पाऊणतास गुप्त चर्चा झाली. या बैठकीनंतर देशमुख यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून दानवे व खोतकर यांच्यात मनोमिलन झाल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीच्या अगोदर खा. दानवे व खोतकर हे जालना येथे झालेल्या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले होते. यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यातील वाद मिटल्याचे मानले जात होते. परंतु त्यानंतर खोतकर यांनी खा.दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याचा पुनरुच्चार केला होता. त्यामुळे या दोेन्ही नेत्यात मनोमिलन होण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागली. आपण अद्यापही मैदान सोडलेले नाही. आपण आज पक्षप्रमुख ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार असून, आपण जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवावी की नाही, याबाबत आता अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेेतील, असे खोतकर यांनी स्पष्ट केले.