दोन प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयाला आरोग्यरत्न पुरस्कार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांची राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत राज्य शासनाकडून या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या संस्थाः  प्राथमिक आरोग्य केंद्र लाडगाव (ता. वैजापूर)  प्राथमिक आरोग्य केंद्र बालानगर (ता. पैठण),  ग्रामीण रुग्णालय पाचोड (ता. पैठण)

निवडीचा निकष आणि प्रक्रियाः राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून वरील डेटाचे सखोल विश्लेषण करून सर्वाधिक उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एका ग्रामीण रुग्णालयाची निवड केली जाते. सन २०२५ २०२६ या वर्षात प्रसूती सेवा, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, माता शिशु आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण कार्यक्रम, मेजर सर्जरी आणि सिझेरियन सेक्शन यांसारख्या सेवांमध्ये सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व परिणामकारक कार्य केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरमधील या तीन संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.

दिमाखदार सोहळा मुंबईत या पुरस्कारांचे प्राथमिक आरोग्य केंद्र वितरण रविवारी (दि. २२) रोजी मुंबई येथे आयोजित विशेष सोहळ्यात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
--- प्रशासनाकडून कौतुकाचा वर्षाव ---
जिल्ह्याला मिळालेल्या या गौरवाबद्दल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी संबंधित संस्थांमधील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने जनसामान्यांच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस केलेल्या परिश्रमांचे हे फळ असून, भविष्यातही दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.