अमोल तागवाले सरांचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल
कन्नड, (प्रतिनिधी): भारताच्या महिला क्रिकेट संघाने आरडब्ल्यूसी जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या अद्भुत विजयाने संपूर्ण देश आनंदात न्हाला आहे. क्रीडाप्रेमींपासून ते कला जगतापर्यंत सर्वत्र जल्लोष दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कला शिक्षक अमोल तागवाले सरांनी महिलांच्या या भव्य विजयाचे अनोखे कौतुक करत अप्रतिम चित्र तयार केले आहे. तागवाले सरांनी आपल्या कलेतून भारतीय महिला खेळाडूंच्या जिद्दीला, मेहनतीला आणि देशप्रेमाला सलाम केला आहे.
क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, तिरंगा, ट्रॉफी आणि देशाचा अभिमान या सर्व गोष्टी त्यांनी कुंचल्यातून अत्यंत सुंदरतेने साकारल्या आहेत. त्यांच्या या चित्रकृतीने सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली असून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ त्यांचे मनापासून कौतुक करत आहेत. खेळाडू मैदानात परिश्रम करतात; आम्ही कलाकार ब्रशद्वारे त्यांचा गौरव करतो, फ्फ़ असे भावनिक उद्रार तागवाले सरांनी व्यक्त केले.
महिला क्रिकेट संघाच्या शानदार परफॉर्मन्समुळे देशातील लाखो मुलींना नवे स्वप्न आणि प्रेरणा मिळाली आहे. अशावेळी तागवाले सरांसारख्या शिक्षकांनी कला माध्यमातून दिलेला सन्मान हा निश्चितच उल्लेखनीय आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अमोल तागवाले सरांना त्यांच्या या प्रेरणादायी कलाकृतीबद्दल सलाम.















