होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आर्य चाणक्यचे नेत्रदीपक यश

Foto
पैठण (प्रतिनिधी) : ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर पैठण येथील शिवेंद्र प्रमोद काकडे व सार्थक गणेश फटांगडे या विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावत नेत्रदीपक यश संपादन केले.

राज्य पातळीवर घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धा परीक्षेमध्ये या वर्षी महाराष्ट्रातील १ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी लेखी परीक्षेच्या पहिल्या फेरीतून १० हजार विद्यार्थी दुसऱ्या प्रात्यक्षिक फेरीसाठी निवडण्यात आले होते. लेखी परीक्षेतील व प्रात्यक्षिक परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे ७५० विद्यार्थ्यांची निवड ही कृती संशोधन प्रकल्प व मुलाखत फेरीसाठी करण्यात आली. सदरील स्पर्धा परीक्षा छत्रपती संभाजीनगर परीक्षा झाली.

 तर मुंबई येथे कृती संशोधन प्रकल्प आणि मुलाखत सादर करण्यात आला. शिवेंद्र काकडे याने जायकवाडी प्रकल्पावर होणाऱ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा तेथील जैवविविधता, पक्षी अभयारण्य व मासेमारीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे तर सार्थक फटांगडे याने पर्यावरणपूरक वीटभट्टी त्यादृष्टीने सखोल अशी मांडणी करत या दोघांनी विषयावर कृती संशोधन प्रकल्प सादर केला. 

या विद्यार्थ्यांना त्यांच्या कृती संशोधन प्रकल्पासाठी पक्षी अभ्यासक सुनील पायघन, प्रा. संतोष गव्हाणे, वन्यजीव रक्षक तथा पक्षी मित्र डॉ. किशोर पाठक, वसंतराव गोरे, शाळेचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी, वर्गशिक्षिका श्रीम. राखी धोकटे, मनोज शिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, विद्या सभेचे अध्यक्ष डॉ. जयंत जोशी, स्थानीय व्यवस्था समितीचे अध्यक्ष डॉ. पद्मकुमार कासलीवाल, कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, शालेय समिती अध्यक्ष शिवाजी मारवाडी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक व अभिनंदन केले.