कृष्णलीला, शिक्षकांचा गौरव, दहीहंडीच्या समरसता भावनेने रंगला आर्य चाणक्यचा सोहळा

Foto
पैठण (प्रतिनिधी) आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथे गोकुळाष्टमी व शिक्षक दिनानिमित्त भव्य संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी दोन्ही उत्सव एकाच दिवशी आल्याने भारतीय संस्कृतीचे दर्शन, समरसता भाव आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुगल किशोर लोहिया, प्रमुख पाहुणे डॉ. पद्मकुमार कासलीवाल, विजय चाटुपळे, मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी व ज्ञानेश्वर उचित आदी च्या शुभहस्ते भगवान श्रीकृष्ण, माता सरस्वती, संत ज्ञानेश्वर महाराज आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आयोजित करण्यात आला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच शिक्षकांची भूमिका पार पाडत शाळेचे दैनंदिन कामकाज सांभाळले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांची जबाबदारी, कार्यपद्धती आणि महत्त्व यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनाचे अनुभव कथन केले. 

काही विद्याथ्यर्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आपले विचार मांडले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गोकुळातील कृष्णलीलेवर आधारित नृत्य व नाटिका सादर केली. राधाकृष्णन तसेच गोपाळ-गोपींच्या वेशातील चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी कृष्णजन्माष्टमी आणि काल्याचे महत्त्व सुदाम पोल्हारे यांनी विषद केले. अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी शिक्षक दिन व कृष्णजन्माष्टमी निमित्त शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी गवळण व शिक्षक गौरवगीते सादर करून वातावरण भारावून टाकले. विद्यार्थी प्रतिनिधींनी स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार केला. 

कार्यक्रमाचा विशेष आकर्षण असलेला दहीहंडी उत्सव सुरू झाला. शाळेच्या प्रांगणात उंच व आकर्षक दहीहंडी बांधण्यात आली होती. डीजेच्या तालावर आणि ङ्गगोविंदा रे गोपाळाफ गोविंदा आला रे आला गोविंदा आलाफ अशा उत्साहपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


विद्यार्थ्यांच्या विविध गोविंदा पथकांनी सुरक्षेचे नियम पाळत मानवी मनोरे रचत सलामी दिल्यानंतर अनेक प्रयत्नांनंतर एका पथकाने शिस्तबद्धपणे व कौशल्याने अंतिम टप्पा गाठत दहीहंडी फोडली. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी या उत्साहपूर्ण सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.

दहीहंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संघभावना, टीमवर्क, परस्पर सहकार्य व समन्वयाचे महत्त्व अनुभवातून शिकता आले. शेवटी दहीहंडी विजेत्या पथकासह सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सर्वांना गोपाळकाला वाटप मधून समरसता ऐक्य भाव निर्माण करण्यात आला.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचलन आर्या सावंत, प्रभावती गायकवाड, समृद्धी डिधुळे व सतीश आहेर यांनी केले तर प्रदर्शन आभार मिनाक्षी पिंपळे यांनी केले.