औरंगाबाद : रिमझिम पाऊस सुरू होताच पर्यटनस्थळाकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांची चांगलीच चांदी होत आहे. मात्र, काही व्यावसायिकांनी पर्यटकांकडून जास्तीची रक्कम वसूल करून लूट चालविली आहे. यामुळे पर्यटकांत नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात दौलताबाद, औरंगाबाद लेणी, वेरुळ लेणी, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळांनी जणू हिरव्या रंगाची चादर पांघरल्याचे दिसत आहे.तसेच म्हैसमाळ हे धुक्यांनी भरलेले असते. हे सुंदर नैसर्गिक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असते. यावर्षी देखील रिमझिम पाऊस सुरू होताच पर्यटकांचे पाऊल दौलताबाद, वेरुळ लेणी, म्हैसमाळ या पर्यटनस्थळांकडे वळाले आहे. रविवारी सुटी असल्याने सर्वाधिक़ पर्यटकांनी म्हैसमाळ, दौलताबाद, वेरुळ लेणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच रिमझिम पाऊस असल्याने पर्यटकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. तसेच दौलताबाद घाटात सर्वाधिक पर्यटकांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.
छोट्या व्यावसायिकांकडून होतेय पर्यटकांची लूट
पर्यटकांची गर्दी पाहता छोट्या व्यावसायिकांनी विविध पदार्थ विक्रीसाठी आपले दुकाने थाटले आहे. यात व्यावसायिकांचा व्यवसायही जोरदार होत आहे. मात्र, काही व्यावसायिक मक्याचे भाजलेले कणिस, भुईमुगाच्या शेंगा जास्तीच्या दरात विक्री करीत आहे. यामुळे पर्यटकांत नाराजी आहे. मक्याचे कणीस 30 रुपये प्रति 500 ग्रॅम ग्राहकांना सध्या मिळत आहे. मात्र दौलताबाद, म्हैसमाळ, वेरुळ लेणीसह आदी पर्यटनस्थळी प्रति मक्याचे कणीस 30 रुपये दराने विक्री केले जात आहे. यामुळे पर्यटकांची लूट केली जात आहे.