मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल

Foto
 मुंबई  : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपताच आता ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. पक्षातील सर्व महत्त्वाची पदे वरळी विधानसभेतील नेत्यांनाच का दिली जातात, असा सवाल नाराज शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आले होते. ठाकरे गट हा भाजपनंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांची गट नोंदणी करताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेच गटनेतेपदाची धुरा देण्यात आली होती. यावरुन आता ठाकरे गटात नाराजीचे वातावरण पसरल्याची माहिती आहे.
 
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेते पद बहाल केल्यावरुन पक्षात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याबद्दल पक्षांतर्गत जोरदार कुजबूज सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ मंडळी निवडून आलेली असताना त्यांना डावलून कोरोना नंतरच्या काळात आरोप झालेल्या व्यक्तीला गटनेते पद दिल्याने अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. तडफदार आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. त्यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांवर पक्षाची बाजू जोरकसपणे मांडली आहे. मात्र, किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात त्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील अशीही एक चर्चा सुरू होती. त्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती. किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म मिळवण्यासाठीही बराचवेळ ताटकळत राहावे लागले होते. यावेळीही त्यांच्याबद्दल प्रभागात नाराजीचा सूर उमटत असतानाही पक्षाने त्यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली होती.

आता महानगरपालिका निवडणुकीनंतर किशोरी पेडणेकर यांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा गटनेतेपदाची जबाबदारी दिली. यंदा ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आदी मातब्बर मंडळी निवडून आली आहेत. या सगळ्यांना डावलून पेडणेकर यांना संधी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोबतच वरळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेतील दोन आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस्ट समिती अध्यक्षपद भूषविलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक अशी पदाधिकार्‍यांची मोठी फौज आहे. त्यामुळे सर्व शिवसेनेतील पदं वरळी विधानसभेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही नाराजी आता उद्धव ठाकरे कशी दूर करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.