नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, कार्यकारी समितीने तो फेटाळला आहे. राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे आता राजस्थानचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तब्बल 20 वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसवर अनेक वर्षांपासून घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे. त्या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीनेच पक्षाचे नेतृत्त्व करावे, तसेच अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींचाही विचार करण्यात येऊ नये, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांचा बुधवारी वाढदिवस झाला.