नांदेड- उध्वव ठाकरेंचे अयोध्येला जाणे म्हणजे केवळ दिखावा असून, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली मार्केटिंग आहे अशी घणाघाती टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे. जर अयोध्येत जाऊन फक्त रामाचे दर्शनच घ्यायचे होते तर ते नाशिकला काळाराम मंदीरात जाऊन देखील घेता आले असते असा टोला चव्हाण यांनी लगावला.
शिवसेनेने राम मंदीराचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरला आहे. त्याच पार्श्वभूमीवर
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शुक्रवारी(ता.२४) हे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत
गेले आहेत. यावर बोलतांना चव्हाण म्हणाले की, राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे,
पाणीटंचाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत याशिवाय सर्वसामान्य जनतेशी
निगडीत अनेक महत्वाचे प्रश्न तसेच पडून आहेत हे सर्व सोडून ठाकरे यांचे अयोध्येला
जाणे म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे.
निवडणुका आल्यात की राम मंदीराचा मुद्दा उपस्थित करणे हा भाजप-शिवसेनेचा जुना
अंजेडा आहे. अनेक महत्वाचे प्रश्न बाजूला सोडून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत मतांचे
ध्रूवीकरण केले जात असल्याचे चव्हाण म्हणाले.
















