नाशिक - देवळाली छावनी बोर्डाचे माजी सीईओ आणि २०१२ च्या बॅचमधील अधिकारी अजय कुमार यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता कमावल्याच्या आरोपाखाली सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात फक्त ५२ हजार संपत्ती घोषित करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या मालमत्तेत काही वर्षातच कोट्यवधीची वाढ झाली. या संशयास्पद वाढीनंतर सीबीआयचे लक्ष या अधिकाऱ्याकडे गेले आणि आता या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.
सीबीआयच्या तपासात केवळ अधिकाऱ्याच्या मालमत्तेचीच नव्हे तर त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि कुटुंबाच्या भूमिकेचीही तपासणी करण्यात आली आहे. अजय कुमार हे आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात मालमत्तेबाबत समाधानकारक हिशोब सादर करण्यात अयशस्वी ठरलेत असा सीबीआयचा आरोप आहे. परिणामी या प्रकरणात त्यांची पत्नी आणि आईला सहआरोपी बनवले आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून हे संपूर्ण प्रकरण सर्वात मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणांपैकी एक मानले जात आहे.
५ कोटी ७२ लाख किंमतीची बेहिशोबी मालमत्ता
अजय कुमार यांच्या मालमत्तेची १ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४ या कालावधीत तपासणी करण्यात आली. तपासाच्या सुरुवातीला त्यांची एकूण मालमत्ता अंदाजे ५२,४२८ रुपये होती. मात्र दहा वर्षांच्या आत त्यांची मालमत्ता वाढून ५ कोटी ५९ लाखापर्यंत झाली. याच काळात त्यांनी ५ कोटी १७ लाख रुपये खर्चही केले. त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या आधारावर एवढ्या मोठ्या संपत्तीचा कोणताही स्पष्ट आधार नाही असं सीबीआयच्या तपासात समोर आले. कायदेशीरपणे त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत १३ लाख ६४ हजार वाचवू शकले असते. मात्र त्यांच्याकडे अंदाजे ५ कोटी ७२ लाख किंमतीची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. या संपत्तीच्या स्रोताबाबत अधिकारी समाधानकारक कागदपत्रे किंवा उत्तरे देण्यास अपयशी ठरले. यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे असं सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पत्नी आणि आई यांचीही चौकशी सुरू
अजय कुमार यांची पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनी त्यांना मालमत्ता आणि संपत्तीचे व्यवस्थापन करण्यास कथितरित्या मदत केली असा सीबीआयचा आरोप आहे. या दोघींनी विविध मार्गांनी कथित काळा पैसा लपवण्यात आणि त्याची व्यवस्था लावण्यात भूमिका बजावली. याच्या आधारावर त्यांना या प्रकरणात सह-आरोपी बनवण्यात आले आहे. याचा तपास अजूनही सुरू असून न्यायालयाच्या कार्यवाहीनंतरच अंतिम निष्कर्ष समोर येतील.