सणांच्या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा सावधानतेचा इशारा

Foto
मुंबई  : गणेशोत्सव व अन्य सणांच्या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी  बोलून दाखवली. आता गणपती येणार आहे. मला सर्वात जास्त भीती आहे की, यात दंगली घडवल्या जातील. जेणेकरून तुम्ही त्यात अडकाल आणि बाकी ठिकाणांवरून तुमचं लक्ष हटेल. आताच मुंबईत एक-दोन घटना घडल्या आहेत. जो सुजाण हिंदू आहे आणि जो सुजाण मुस्लिम आहे, त्यांना मी सांगतोय सतर्क राहा, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. 

यावेळी बोलताना, राज ठाकरे यांनी डीजे, डॉल्बी आणि सणांच्यावेळी कार्यक्रमांमध्ये महिला नाचवणे ही उत्तरेची संस्कृती आहे. आपण ती आपल्या सणांमध्ये का आणत आहोत, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी एकप्रकारे डीजे, डॉल्बी म्हणजेच सण आणि संस्कृती अशी भूमिका मांडणार्‍या राजकारणी आणि संबंधितांना खडे बोल सुनावले आहेत. सण साजरे करा.  कसले डॉल्बी आणि डीजे लावता. आपल्या पारंपारिक पद्धतीने सण का साजरा होत नाही? इतक्या श्रद्धेने तो गणपती घरी आणायचा आणि विसर्जन करताना नाचायचे, कसला आनंद होतो? माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती येतो. ज्यावेळेला जो आपण घेऊन जातो, त्यावेळी ओकंबोकं वाटतं घरं, उत्साह गेल्यासारखं वाटतं, वाईट वाटतं. त्याचा आनंद कसला व्यक्त करतो आपण, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान सध्या महाराष्ट्रात सणांच्यावेळी डीजे वाजवायचा की नाही, यावरुन वाद सुरु आहे. यावर मुख्यमंत्री काय बोलले? मुख्यमंत्री सांगत आहेत की, कायद्याने आम्हाला डीजे बंद करता येत नाही, मग नागपूरमध्ये डीजे कसा बंद झाला?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

महापुरुषांच्या रांगेत दुसरं कोणी बसू शकत नाही...
मध्यतंरी एक प्रकरण झालं, अमित पुण्याला गेला असताना पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्यावरून वाद निर्माण झाला, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्व मंडळींच्या रांगेत दुसरं कोणी बसू शकत नाही. सरकारी कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असायला पाहिजे का? तर असायला पाहिजे, लावला पाहिजे का? तर हो लावला पाहिजे, ते पंतप्रधान आहेत, बाकी मतभेद शंभर असतील, पण दुसर्‍या भिंतीवरती, त्या रांगेत नाही, मला असं वाटतं जे सरकारी अस्थापन आहेत, शाळा आहेत, इतर काही गोष्टी असतील, त्यांनी फोटो लावावेत फक्त ही गोष्ट त्यांनी नीट पाळणं गरजेचं आहे, कोणाबरोबर कुठले फोटो लागले पाहिजेत आणि कुठल्या रांगेमध्ये कोणाचे फोटो असले पाहिजेत, आणि पंतप्रधान असतील कोणी असेल त्यांचे फोटो कोणत्या रांगेत, भिंतीवरती लागले पाहीजेत, ते मला वाटतं कोर्टामध्ये देखील कळलं पाहिजे, आणि इतर शैक्षणिक आणि अस्थापनामध्ये देखील कळलं पाहिजे त्यामुळे आत्ताच सुधारून घ्या, असंही पुढे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.