तिसगाव परिसरात बळाचा वापर करत जमिनी बळकावण्याचा प्रयत्न

Foto
नोटीस न देता ताबा देण्यास विरोध, बाजारभावाप्रमाणे मोबदला द्या, सिडकोविरुद्ध शेतकरी आक्रमक

वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : सिडको प्रशासनाकडून कुठलीही कायदेशीर नोटीस अथवा मोबदला न देता पोलीस बंदोबस्तात जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा गंभीर आरोप तिसगाव भागातील स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री व सिडकोच्या मुख्य प्रशासकांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, सिडकोने आपली कारवाई थांबवावी. 

यादरम्यान जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी सिडकोची राहील. असा इशाराही संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. तिसगाव येथील गट क्रमांक १९५ मधील जमिनीबाबत शेतकऱ्यांना अद्याप १२-२ ची कोणतीही कायदेशीर नोटीस प्राप्त झालेली नाही. यापूर्वी १९९८ मध्ये मिळालेल्या नोटीसीविरोधात संबंधित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असून, तब्बल २८ वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे. कोर्टाचा अंतिम निकाल लागलेला नसून, शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक मोबदला मिळालेला नाही. मात्र सिडको पोलीस बळाचा वापर करून जमिनी हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

-- तर प्रशासन जबाबदार -- 
दरम्यान, सिडकोची संपूर्ण टीम पोलिसांना सोबत घेऊन दबाव आणत आहे. या जबरदस्तीच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा नुकसान झाल्यास मुख्य प्रशासक व सिडको प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर डॉ. भरतसिंग सलामपुरे, हिरालाल सूर्यवंशी, रमेश कसुरे, आकाश सूर्यवंशी, चंद्राबाई सलामपुरे, देविलाल सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

-- बाजारभावाप्रमाणे मोबदल्याची मागणी -- 
आम्हाला १२-२ ची नोटीस न मिळाल्याने आम्ही कोर्टात जाऊ शकलो नाही. सिडको कोणतीही पूर्वकल्पना अथवा मोबदला न देता जमिनी बळकावत आहे. यामुळे हा आमच्यावर अन्याय आहे. जर प्रशासनाला आज जमिनी घ्यायच्या असतील तर आम्हाला आजच्या बाजारभावाने मोबदला द्यावा, त्याशिवाय आम्ही ताबा देणार नाही, अशी ठाम भूमिका प्रा. डॉ. भरतसिंग सलामपुरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.