मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोन नेत्यांनी अजित पवारांच्या मृ्त्यूनंतर सुनेत्रा पवार यांना न कळवता पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
अजित पवार यांचा अपघात २८ जानेवारी रोजी झाला त्या दिवसांपासून सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत या मधल्या काळात जर कोणी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला असेल तर तो गृहीत धरू नये असे पत्र सुनेत्रा पवार यांनी लिहिल्याचे रोहित पवार म्हणाले. याचे कारण म्हणजे अजितदादांच्या अपघातानंतर १८ व्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी २०२६ रोजी एक पत्र अजितदादांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव अशा तीन लोकांच्या सह्या होत्या. या पत्रामुळेच सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला संबंधित पत्र लिहिल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.
निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात नेमकं काय मजकूर होता हे देखील रोहित पवारांनी पुढे स्पष्ट केले. ते म्हणाले की, “…त्यांनी या सह्या कशावर केल्या आहेत? तर त्यामध्ये त्यांनी खोटं सांगितलं की, त्यांच्या पक्षाचं संविधान बदलण्यात आलं आहे, आणि त्यामध्ये कार्याध्यक्षांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले जातील. म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त १८ दिवस झाले होते आणि १६ फेब्रुवारीला हे पत्र सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता या तीन नेत्यांनी, आणि खासकरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार आणि पक्षाची ताकद हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून देण्यात आली. जे सुनेत्रा काकींना कळलं असावं म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लगेचच पत्रव्यवहार केला,” असे रोहित पवार म्हणाले.
इतकेच नाही तर अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू करण्याचा प्रयत्न झाल्याचेही रोहित पवार यावेळी म्हणाले. अजितदादा हयात असताना, त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली जाते. कदाचित नाशिकच्या भोंदू बाबाच्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर काळी जादू, पूजा करण्याचा प्रयत्न होतो. त्यामागे पक्षावर नियंत्रण यावं असं काही होतं का? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यानंतर २८ तारखेला अजितदादांचा अपघात झाला, पण योगायोग बघा दोन दिवसांत पीयुष गोयल यांचं वक्तव्य येतं की, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. नंतर ते म्हणाले की मी चुकून बोललो. पण क्रमवारी बघीतली तर असं दिसतंय की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही इतर पक्षांच्या मोठ्या नेत्यांमध्ये कदाचित या गोष्टी अधीच ठरल्या होत्या, असे रोहित पवार म्हणाले.
जेव्हा अजितदादांचा अंत्यविधी होत होता तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काय हेतू घेऊन तेथे आले होते? २७ तारखेच्या बैठकीचा काय हेतू होता, त्याला उशीर का झाला हे देखील तपासलं गेलं पाहिजे असे आमचे मत आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
पटेल आणि तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता – रोहित पवार
हे सिद्ध होतं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. कारण अजितदादा हयात असताना जे फालतू खर्च होते, नरेश अरोरा वरचा खर्च इतरही खर्च असतील, पक्षात काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत होत्या. काही लोकांनाचं कर्तृत्व नसताना देखील त्यांना पक्षात मोठं-मोठी पदे देण्यात आली होती. दादा कार्यकर्त्यांचं, आमदारांचं ऐकत होते, पण या लोकांचं ऐकत नसल्याने या लोकांनाच संपूर्ण पक्ष आपल्या नियंत्रणात यावा हे हवे होते का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. “सुनेत्राकाकींना मला एवढंच सांगायचं आहे की, राजकारण लै वंगाळ झालेलं आहे. अवतीभोवती जी लोकं आहेत त्यांच्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.” असा इशारा रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिला.
“अधिवेशनात दादांच्या अपघाताबद्दल एक-दोन आमदार सोडले तर कुठलाही आमदार बोलला नाही कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की दादांच्या अपघाताबद्दल अजिबात बोलायचं नाही. जय पवार देखील पत्रकार परिषद घेणार होते पण ती का झाली नाही. त्याचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करत आहे का? या सगळ्या गोष्टी बघीतल्यानंतर आमचं मत आहे की, कुठेतरी हा कट अधीच रचण्यात आला होता का? पक्षावर नियंत्रण मिळवण्याच काही लोकांचा हेतू होता का? आणि मग दादांचा अपघात… म्हणून आम्ही गुन्हेगारी चौकशी व्हावी असं आम्ही सातत्याने म्हणतोय” असेही रोहित पवार म्हणाले.