औरंगाबाद : सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अतिशय प्रेमाने वागविणार्या आणि सतत सामाजिक कार्यक्रमात व्यस्त असलेल्या आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रीपद मिळाल्याचा मोठा आनंद कार्यकर्त्यांना झाला आहे. पक्षवाढीसाठी सावे यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
पूर्व मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सावे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल, अशी चर्चा होती. मात्र गेले साडेचार वर्ष मंत्री पदाने सावे यांना हुलकावणी दिली. एमआयएमच्या उदयाने जिल्ह्यातील बदललेली राजकीय परिस्थिती आणि शहरातील कचरा, पाणी, रस्ते प्रश्नाचा गुंता अशा बिकट प्रसंगी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल सावे यांना मंत्रिपद मिळाले आहे. सावे यांच्या रूपाने भाजपने पहिल्यांदाच औरंगाबाद शहरातून निवडून आलेल्या आमदाराला मंत्रिपद दिले आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांत मोठा जल्लोष करण्यात येत आहे. शहराचा समतोल विकास साधण्याचे आव्हान सावे यांच्यासमोर आहे.
जालना-औरंगाबाद या दोन जुळ्या जिल्ह्यामध्ये भाजपाने प्रचंड प्रभाव निर्माण केला आहे. एक केंद्रीय राज्यमंत्रीपद, विधानसभा अध्यक्षपद आणि आता दोन राज्यमंत्री पदे भाजपच्या खात्यात जमा झाली आहेत. तुलनेने शिवसेनेकडे केवळ एकच राज्यमंत्रीपद आहे. भाजपचा वाढलेला प्रभाव सेनेला मुळीच खपणार नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळल्यानंतर सेनेने वजाबाकीचे तर भाजपने बेरजेचे राजकारण सुरू केल्याचे दिसते. एमआयएम हा भाजप आणि सेनेचा समान शत्रू! या शत्रूला नामोहरण करण्यात वरचढ कोण ठरते, हे दाखविण्याची अहमिका या दोन पक्षात लागली आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे. या मित्रपक्षातील चढाओढी मुळेच एमआयएमला बळ मिळते यात शंका नाही.
काही दिवसांपूर्वी खैरे यांनी पूर्व मतदारसंघ शिवसेना जिंकू शकते, असे वक्तव्य केले होते. तेव्हाच भाजपच्या मतदारसंघावर सेनेचा डोळा असल्याचे दिसून आले. आता भाजपने सावे यांना मंत्रिपद दिले आहे. शिवसेना पूर्व मतदारसंघावर निशाणा साधून असताना भाजपने मंत्रिपदाची खेळी खेळली. याचा अर्थ शहरातील भाजपची सूत्रे अतुल सावे यांच्याकडे जाणार यात शंका नाही.











