औरंगाबाद- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन होते आहे. या अधिवेशनासाठी देशभरातून भाजपचे पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. औरंगाबाद मधून देखील भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार, पदाधिकारी हे दिल्लीत पोहचले आहेत. ऐरवी शहराच्या विकासकामांच्या प्रश्नांवर जबाबदारी झटकणारे हे नेते दिल्ली दरबारी आवर्जून उपस्थित राहीले आहेत.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता.
त्यामुळे या राष्ट्रीय अधिवेशनाला महत्त्व आले आहे. या अधिवेशनासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी
यांच्यासह पक्षाचे केंद्रीय मंत्री विविध राज्यांतील मंत्री, राष्ट्रीय
कार्यकारिणीचे सदस्य, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य,
संसदेतील सदस्य, विधानसभांतील सदस्य, विविध शहरांतील पक्षाचे महापौर दिल्लीत दाखल झाले आहेत. अधिवेशनाचे उदघाटन
झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
शहरातील पदाधिकारी दिल्लीत
नववर्षात आगमन होताच आगामी लोकसभा आणि विधानसभेचे निवडणुकीचे वारे जोरदार
वाहू लागले आहेत. दिल्लीत होणाऱ्या या अधिवेशनात पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष
शहा हे स्वत: कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने शहरातील भाजपचे
पदाधिकारी, कार्यकर्ते हवाई आणि रेल्वेमार्गाने दोन दिवसांआधीच दिल्लीत दाखल झाले.
दिल्लीतल्या मार्गदर्शनाची शिदोरी सोबत घेऊन स्थानिक कुरघोडीच्या राजकारणात भाजपचे
नेते पक्षाचा प्रभाव पाडण्यास यशस्वी होतील का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
आमदार अतुल सावे, आमदार नारायण कुचे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी,
उपमहापौर विजय औताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित असल्याची
माहिती समजते.