औरंगाबाद, जालन्यासह राज्यातील 14 मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावणार

Foto


औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात औरंगाबाद, जालनासह राज्यातील जळगाव, रावेर, पुणे, बारामती, अहमदनगर, रायगड, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या चौदा मतदारसंघांमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार असून, आज रविवारी सायंकाळी 6 वाजता या मतदारसंघांतील प्रचाराची सांगता होत आहे. महाराष्ट्रासह 14 राज्यांतील 115 मतदारसंघांमध्येही गुरुवारी मतदान होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आज रॅली काढून जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले. शेवटच्या टप्प्यात ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा, रॅली, बैठकांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे.
 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे आ. सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यासह एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत खैरे, झांबड, जाधव, जलील या चार प्रमुख उमेदवारांमध्ये होणार, असे चित्र आहे. जालना मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. 

त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली दानवे यांनी विलास औताडेंचा पराभव केला होता. मागील निवडणुकीत मोदी लाटेतही औताडे यांना 4 लाख 85 हजार मते मिळाली होती. यावेळी अशी कुठलीच लाट नसल्याने औताडे हे दानवेंना चांगली टक्‍कर देतील, अशी चिन्हे आहेत. औरंगाबाद व जालना मतदारसंघातील चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.औरंगाबादमध्ये काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आ.झांबड यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, स्टार प्रचारक नवज्योतसिंग सिद्धू आदी नेत्यांनी बैठका व जाहीर सभा घेऊन वातावरण ढवळून काढले आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रवक्‍ते शाहनवाज हुसेन, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, भाजपचे आ.टी. राजा, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तर जालन्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या.

 
प्रशासनाने निवडणुकीची आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन पूर्णपणे सील करण्यात आल्या असून, मतदानाचे साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार संपणार असून, त्यानंतर खर्‍या अर्थाने गुप्‍त प्रचाराला वेग येणार आहे. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे, भाजपच्या कांचन कुल, रायगडमध्ये शिवसेनेचे खा.अनंत गिते, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे, भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, पुणे मतदारसंघात भाजपचे गिरीश पाटील, काँग्रेसचे मोहन जोशी, अहमदनगर (दक्षिण) मध्ये राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप, भाजपचे डॉ.सुजय विखे, जळगावात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर, भाजपचे आ.उन्मेष पाटील, रावेरमध्ये खा.रक्षा खडसे, काँग्रेसचे डॉ.उल्हास पाटील, सातारामध्ये राष्ट्रवादीचे खा.उदयनराजे भोसले, शिवसेनेचे संजय महाडिक तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे खा.विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नीलेश राणे या प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीचा व अटीतटीचा सामना होत आहे.

खरी लढत झांबड-खैरे यांच्यातच
लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. असे असले तरी खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड आणि शिवसेना-भाजप युतीचे खा. चंद्रकांत खैरे यांच्यात होणार आहे. झांबड-खैरे हे दोन्ही उमेदवार प्रबळ दावेदार असल्याने मतदारांचा कलही या दोन्ही पक्षाकडे वळला आहे.