'खासदार चंद्रकांत खैरेंना ओव्हर कॉन्फिडन्स; यंदा ना मोदी लाट, ना सहानुभूती चालणार'

Foto

सांजवार्ता ऑनलाईन 


औरंगाबाद शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणूक सोपी राहाणार नाही याचे संकेत मागील आठवड्यातील राजकीय भेटीगाठीवरुन दिसत आहेत. चारवेळा खासदार आणि दोन टर्म आमदार राहिलेले खैरे यांचा आत्मविश्वास सातव्या आसमानवर आहे. मात्र यंदा ना मोदी लाट आहे ना खासदार खैरेंनी औरंगाबादकरांसाठी काही काम केले आहे. त्यामुळे विजयी मीच होणार.’ हा त्यांचा आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. 

 

खैरेंना ओव्हर कॉन्फिडन्स

शिवसेनेचे उपनेते असलेल्या खासदार खैरे यांना २०१९च्या निवडणुकीत तगडे आव्हान देण्याची विरोधकांची तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादची जागा काँग्रेसकडून मागून घेऊ असे म्हटले आहे. त्यातच माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांनी त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीने ही जागा लढवली तर विजय नक्की असल्याचे शरद पवारांची भेट घेऊन सांगितले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष (भाजप) देखील औरंगाबादमध्ये वॉर्ड आणि बुथ स्थरावर काम करत असून युती झाली नाही तर यंदा खैरेंना चीतपट करण्याची भाजपची तयारी सुरु आहे.

१९९९ ते २०१४ पर्यंत खैरे प्रत्येक निवडणुकीत विजयी होत आहेत. यात त्यांचे मताधिक्यही वाढत गेले. विजयाच्या या चढत्या आलेखामुळेच, माझ्या विरोधात कोणीही उभे राहिले तरी मला भीती नाही, असे खैरे म्हणत आहेत. मात्र यंदाची परिस्थिती पाहाता, त्यांचा हा आत्मविश्वास फोल ठरणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार सतीश चव्हाण यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीत औरंगाबाद कोणाला सुटते यावरच चव्हाणांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबादवर दावा सांगितला आहे. मागील २० वर्षांपासून काँग्रेस येथे पराभूत होत आहे, त्यामुळे यंदा ही जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी त्यांची मागणी आहे. औरंगाबादचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते रामकृष्ण बाबा पाटील यांनी नुकतीच पवारांची भेट घेऊन, राष्ट्रवादीने औरंगाबादची जागा लढवली तर विजय नक्की असल्याचे त्यांना सांगितले आहे.

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडूनच राष्ट्रवादीसाठी ही जागा मागून घ्या, असे स्वतः पवारांना सांगितले जात असेल तर औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सुटण्यास फार अडचणी येणार नाही. मात्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण औरंगाबादची जागा सहजासहजी सोडतील असे होणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड इच्छूक आहेत. याशिवाय आमदार अब्दुल सत्तार यांनाही काँग्रेस रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

भाजपचाही औरंगाबाद लोकसभेवर डोळा आहे. विधानसभा सभापती हरीभाऊ बागडे किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची नावे भाजपकडून चर्चेत आहेत. याशिवाय  वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आघाडी देखील औरंगाबाद लोकसभा लढविण्यास इच्छूक आहे. औरंगाबाद मध्य विधानसभेत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची चांगली पकड आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघातून एमआयएम क्रमांक दोनवर राहिली होती. अवघ्या साडेचार – पाच हजारांनी डॉ. गफ्फार कादरी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे तिसरी आघाडी म्हणून समोर येत असलेल्या या आघाडीच्यावतीने एमआयएम या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेणार आहे.

 

१९९९ पासून २०१४ पर्यंत फक्त उत्तमसिंग पवारांनी दिली तगडी टक्कर

चंद्रकांत खैरे यांनी १९९९ ला सर्वप्रथम औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते औरंगाबादमध्ये अजेय राहिले आणि शिवसेनेचा गड बनला आहे.

१९९९ मध्ये काँग्रेसने खैरेंच्या विरोधात माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांना रिंगणात उतरवले होते. शिवसेनेविरोधात मुस्लिम उमेदवार देण्याची चाल काँग्रेवरच उलटली आणि ५५ हजार मतांनी खैरे लोकसभेवर निवडून गेले होते.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रामकृष्ण बाबा पाटील यांना उमेदवारी देऊन शिवसेनाचा गड जिंकण्याची रणनीती आखली होती, तीही फोल ठरली. यावेळी खैरे १ लाख २१ हजार मतांनी विजयी झाले.

२००९ मध्ये माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी खैरेंना चांगलेच झुंजवले होते. पवारांनी जबरदस्त टक्कर दिली मात्र ३३ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला आणि खैरेंची लोकसभेत हॅट्रिक झाली.

२०१४ च्या मोदी लाटेत खैरेंनी तब्बल दीड लाखांची आघाडी घेत काँग्रेसच्या नितीन पाटील यांचा पराभव केला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आता मोदी लाट नाही आणि औरंगाबादकरही त्यांच्या कामावर समाधानी नाही. अशा परिस्थितीत खैरेंच्या विरोधात कोण उमेदवार असणार यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यातच शिवसेनेंतर्गत असलेली गटबाजी शांत करण्यात खैरे यशस्वी होतात के हेही पाहावे लागेल.