औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबादची जागा काँग्रेसनेच लढवावी यावर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. मात्र काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावर एकमत होऊ शकलेले नाही अशी माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सोडू नये यावर काँग्रेसचे कारभारी ठाम असले तरी येथील अनेक आजी-माजी आमदार आणि इतरही पदाधिकारी औरंगाबाद लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक आहेत. यामुळे औरंगाबादच्या जागेसंदर्भात काँग्रेसमध्ये सध्यातरी एक अनार सौ बिमार अशीच स्थिती समोर येत आहे.
आजी-माजी आमदार, खासदार होण्यासाठी इच्छूक
औरंगाबाद मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्यावतीने
निवडणूक लढविण्यासाठी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुभाष झांबड,
फुलंब्रीचे माजी आमदार डॉ.
कल्याण काळे, माजी आमदार नामदेवराव पवार आणि उद्योजक
मिलिंद पाटील हे इच्छुक आहेत. गुरुवारी मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या काँग्रेस
पक्षाच्या बैठकीत चारही इच्छुकांची मते पक्षश्रेष्ठींनी जाणून घेतली. जिल्ह्यातील
काँग्रेसच्या सर्वच नेत्यांकडून औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडु नये
अशी आग्रहाची मागणी करण्यात आली.
अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा
निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मतदारसंघ निहाय आढावा सुरु झाला आहे. गुरुवारी मुंबईतील
टिळक भवन येथे औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात
आला. औरंगाबादची जागा सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत
खैरे मागील चार टर्म येथून लोकसभेवर निवडून जात आहेत. २०१९ मध्ये शिवसेनेच्या
ताब्यातील ही जागा जिंकण्याचे काँग्रेस नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेचे
खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करण्यासाठी प्रबळ उमेदवाराचा शोध सुरु झाला
आहे.
मुंबईतील टिळक भवन येथे राज्यातील ४८ लोकसभा मतदार
संघातील इच्छुक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,
तालुका अध्यक्ष,
राज्य
कार्यकारिणी पदाधिकार्यांची महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष
अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,
माजी
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात,
माजीमंत्री
नसीमखान व संपतकुमार उपस्थित होते. या बैठकीत
औरंगाबादमधील इच्छुक आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे,
माजी आमदार
नामदेवराव पवार व उद्योजक मिलिंद पाटील यांच्याशी पक्षश्रेष्ठींनी स्वतंत्र चर्चा
केली. यावेळी सर्वच इच्छुकांनी काँग्रेस पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांना निवडून
आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. ही जागा काँग्रेस
पक्षाला जिंकून देण्यासाठी परिश्रम घेतले जातील असेही सांगण्यात आले.
काँग्रेससाठी वातावरण अनुकुल
जिल्ह्यातील काही नगर परिषदा,
पंचायत समिती
काँग्रेसच्या ताब्यात आहे. तसेच जिल्ह्यात जनतेच्या शेतकर्यांच्या,
बेरोजगारांच्या प्रश्नावर एल्गार यात्रा, संघर्ष यात्रेच्या निमित्ताने जनसंपर्क वाढला
आहे. जनतेतून काँग्रेस पक्षासाठी वातावरण असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठल्याही परिस्थितीत औरंगाबादची जागा सोडू नये अशी
आग्रहाची मागणी जिल्ह्यातील सर्वच पदाधिकार्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.
सर्वांची पसंती झांबड यांना
लोकसभेसाठी जिल्ह्यातील कन्नड,
गंगापुर,
खुलताबाद,
वैजापुर,
औरंगाबाद
शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य, विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे तालुका
अध्यक्ष, शहराध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्यासह आजी-माजी
पदाधिकार्यांनी औरंगाबादमधून सुभाष झांबड यांच्या नावाची शिफारस केली आहे.
त्यामुळे झांबड यांच्या उमेदवारीला हिरवा झेंडा दाखविण्याची दाट शक्यता आहे.
आमदार अब्दुल सत्तार गैरहजार
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिल्लोडचे
आमदार अब्दुल सत्तार हे गुरुवारी मुंबईत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या
महत्वपूर्ण बैठकीला गैर हजर होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नसल्याचे
सांगण्यात येत आहे.












