औरंगाबाद - शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्हा लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना शह देण्याची तयारी काँग्रेस, भाजप आणि एमआयएम या पक्षाकडून करण्यात येत आहे. खैरे यांच्याशी टक्कर देणारा उमेदवार कोण याचा शोध सध्या सर्व पक्षांमध्ये सुरू आहे.
गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेने
जिल्ह्यातील राजकारणात छाप पाडलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या शहरातील
महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या
आणि नगर परिषदांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे सदस्य निवडून आणले आहेत. लोकसभा
मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून सलग चार वेळा ताब्यात ठेवण्यात यश आले.
या मतदारसंघातून खा. चंद्रकांत खैरे हे सलग निवडून येत आहे. पाचव्यांदा निवडून
येण्यासाठी खा. खैरे कामाला लागलेले आहेत. पण यावेळेसची राजकीय परिस्थिती मात्र
बदलली आहे.
गतवर्षी मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या दसरा
मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर
लढविण्याचा निर्णय घेतला. सेनेच्या या निर्णयामुळे भाजपमध्ये खळबळ उडालेली आहे. आज
ही भाजपची मंडळी सेनेसोबत युती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. पण सेनेकडून भाजपला
प्रतिसाद मिळत नसल्याने भाजपने ही राज्यातील सर्व 48 जागा लढण्याची
तयारी केली आहे. यदा कदाचित भाजप- सेना युती झाली नाही,
तर भाजपने
पक्षातर्फे सर्व तयारी केलेली आहे. भाजपतर्फे पक्षाच्या बैठका घेऊन उमेदवाराची
चाचपणी सुरू केलेली आहे. खा. खैरे यांना शह देऊन सेनेची जागा ताब्यात घेण्याच्या
हेतूने टक्कर देणार्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. तर काँग्रेस पक्षाच्या
वतीने ही यावेळी लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे.
सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष म्हणून
काँग्रेसची ओळख आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष खैरेच्या पराभवासाठी सज्ज झाली आहे.
सेना- भाजपची युती होणार नाही. हे गृहीत धरून काँग्रेस पक्ष बांधणीसह बुथ बांधणी
केली आहे. तसेच शहरातील व जिल्ह्यातील मुस्लिमांची लोकसंख्या आणि दलितांची मोठी
लोकसंख्या विचारात घेऊन नव्याने राज्यात स्थापन झालेल्या व भारिप-एमआयएम युतीच्या
वतीने ही लोकसभेचा सेनेचा गड जिंकण्यासाठी प्रबळ उमेदवाराचा शोध सुरू केलेला आहे.
खा. खैरे यांना यावेळेसची निवडणूक पूर्वीप्रमाणे सोपी राहिलेली नाही. यावेळी युती
होणार नसल्याने हिंदुत्ववादी मतदारात फूट पडणार आहे. खैरेंची व्होटबँक फुटणार आहे.
तर
काँग्रेसच्या
व्होट बॅँकेत, भारिप-एमआयएम आघाडी फूट पाडणार असल्याने
औरंगाबाद लोकसभेचा गड राखण्यात खैरेंना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.