औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने आरक्षणाची आधीपासूनच मागणी करणाऱ्या समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुस्लिम आणि धनगर समाजातील संघटना आक्रमक झाल्या असून न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आता या दोन्ही समाजातील नेते मंडळी तयार आहेत. मुस्लिमांनी धर्माच्या आधारावर आरक्षण अजून मागीतलेच नाही, हा तर सरकारने आणि विरोधीपक्षाने निर्माण केलेला भ्रम असल्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.
हिवाळी अधिवेशनात भाजप सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण
जाहिर केले. मात्र मराठा समाजाबरोबरच गेली अनेक वर्षे आरक्षणासाठी लढा देत
असलेल्या, मुस्लिम आणि
धनगर समाजाला मात्र भाजप सरकारच्या या निर्णयामुळे धक्का बसला आहे. ज्या धर्तीवर
मराठा समाजाला आरक्षण दिले जाते, त्याच धर्तीवर मुस्लिम समजला देखील सरकारने आरक्षण
द्यायला हवे होते. आपण मुस्लिम आरक्षणासाठी आता न्यायालयीन लढा उभारणार असल्याचे 'सांजवार्ता ऑनलाईन'शी बोलताना आमदार इम्तियाज
जलील यांनी सांगितले आहे. जलील म्हणाले, की मुस्लिमांनी धर्माच्या आधारावर आरक्षण
मागीतलेच नसून मुस्लिम समाजातील शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागास असणाऱ्या
घटकांसाठी आम्ही आरक्षण मागत आहोत, असे जलील यांनी स्पष्ट केले आहे. मुस्लिम समाज धर्माच्या आधारावर आरक्षण मागत असल्याचा भ्रम सरकार आणि विरोधी पक्षाने पसरवलेला आहे.










