औरंगाबाद : रेल्वेस्थंनकावरील फलकावर असलेल्या औरंगाबाद नावाला पेंटने रंगवून त्याठिकाणी संभाजीनगर असे स्टिकर लावल्याने मद्यरात्री 12 च्या सुमारास औरंगाबाद रेल्वे स्थानकावर एमआयएम कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.याप्रकरणी औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने दोघांना अटक केली आहे.
नितीन रामराव निर्मळ वय-34 (द्वारकानगर, एन-11),रुद्राक्ष गणपत वाकुडे वय-25 (रा.पुंडलीकनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत तर पंकज दहिवाल (रा.मुंबई) हा फरार आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास नितीन रुद्राक्ष, पंकज आणि एक सहकारी असे चौघेजण औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आले व चौघांनी स्थानकावरील औरंगाबाद शहराचे नाव दर्शविणार्या नामफलकावर पिवळ्या रंगाचा पेंट टाकून नामफलकावर खाडाखोड केली व त्यानंतर सोबत आणलेल्या संभाजीनगर लिखित बॅनर त्या नामफलकावर डकविण्यात आले. व त्यानंतर या मंडळींनी फोटो व्हिडिओ शूट करून पोबारा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी मोठ्यासंख्येने रेल्वेस्थानक गाठले व घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत संतप्त घोषणाबाजी करणार्या कार्यकर्त्यांची समजूत घातली त्या नंतर प्रकरण निवळले. या प्रकरणी चार जना विरोधात तेढ निर्माण करणे व रेल्वेच्या नामफलकावर खाडाखोड करणे ,विना परवानगी प्रवेश करणे इत्यादी कलमाखाली रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नंतर औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मधुकर सावंत,उपनिरीक्षक विजय पवार यांनी तातडीने सूत्र हलवीत नितीन निर्मळ आणि रुद्राक्ष वाकुडे या दोन्ही आरोपिना अटक केली आहे तर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच पंकज दहिवाल हा पसार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.









