औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यातील सतरा मतदारसंघांमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पडावे, यासाठी मतदान असलेल्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून पोलिसांची कुमक पाठविण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची 70 जणांची एक तुकडी धुळे येथे पाठवण्यात आली. मात्र, तेथील पोलिस प्रशासनाला औरंगाबाद ग्रामीण पोलिस बंदोबस्तासाठी येणार असल्याची माहिती नसल्यामुळे व तेथे आवश्यक सोयी-सुविधा नसल्यामुळे ग्रामीण पोलिसांना कालची रात्र रस्त्यावरच जागून काढावी लागली.
धुळे, नाशिकसह महाराष्ट्रातील 17 लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होणार असून, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पोलिस, एस. आर. पी. चा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे येथे औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलातील 70 पोलिसांची एक तुकडी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. धुळे प्रशासनाला औरंगाबाद ग्रामीण पोलिस बंदोबस्तासाठी येणार असल्याची माहिती नाही, असे उत्तर तेथील अधिकारी येथून गेलेल्या पोलिस कर्मचार्यांना देत आहेत. औरंगाबाद येथून धुळे जिल्ह्यात निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्यांना शुक्रवारची रात्र अक्षरश: रस्त्यावर जागून काढावी लागली. सुविधा नसल्याने त्यांना प्रात:विधी एका गावाशेजारी उरकावा लागला. औरंगाबादहून गेलेल्या पोलिसांना तेथे ना जेवण मिळाले ना पाणी. या पोलिस कर्मचार्यांना तेथे मूलभूत सोयी-सुविधा न मिळाल्यामुळे त्यांची गैरसोय झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात गेल्या 23 एप्रिल रोजी मतदान झाले. मतदान काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी तब्बल साडेचार हजार पोलिसांचा ग्रामीण भागात बंदोबस्त लावला होता. बंदोबस्तासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेशातूनही पोलिस कर्मचारी आले होते. येथील प्रशासनाने त्यांची पुरेपूर काळजी घेतली होती. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना जेवणाची, राहण्याची, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेबद्दल ग्रामीण पोलिस दलाचे नाव सबंध महाराष्ट्र पोलिस दलात सध्या चर्चेत आहे. मात्र, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना बाहेरगावी बंदोबस्तासाठी गेल्यावर रस्त्यावर रात्र काढावी लागली.