औरंगाबादमध्ये उडत आहेत राजकीय फटाके, विद्यामान आमदारांसह इच्छूकांचे दिवाळी पहाटच्या निमित्ताने जनसंपर्क अभियान

Foto

औरंगाबाद - दिवाळीच्या धामधुमीत शहरात राजकीय फटाक्यांच्या आतिषबाजी रंगली आहे. २०१९ च्या लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यसमोर ठेवून भावी आमदार-खासदारांनी  आपापल्या मतदार संघात दिवाळी पहाट तसेच इतर सांस्कृतिक, साहित्यीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासोबतच काही नेते एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करुन राजकीय फटाकेही फोडत  आहेत.  मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असतांनाही शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमांना शहरातील पुढारी प्राधन्य देत असल्याबद्दल नागरिकांमधून खंत व्यक्त होत आहे. 

 

दिवाळी पहाटया सांगितिक मेजवानीच्या निमित्ताने राजकीय नेते मतदारसंघात एकप्रकारे आपले संपर्क अभियान राबवत आहेत. मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यासाठी आता अशा कार्यक्रमांची मोठी मदत होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर आहेत.

 

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल सावे यांनी सिडको एन-३ येथील मैदानावर अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगाकर आणि सौरभ दफ्तरदार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या दिवाळी पहाट कार्यक्रमापेक्षा आमदार सावेंनी पहाटे-पहाटेच बाऊन्सरच्या श्रीमुखात लगावल्याचीच चर्चा शहरात अधिक होती.   

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या आणि फुलंब्री मतदार संघातून पराभूत झालेल्या जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण यांनी मुकुंदवाडी येथे दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला. यासाठी त्यांनी सारेगामाफेम गायिका कार्तिकी गायकवाड हिला निमंत्रित केले. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, मात्र दानवेंनी दिवाळी आपल्या गावी भोकरदनमध्येच साजरी करण्याला प्राधान्य दिले.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण हे मागील १२ वर्षांपासून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. यंदा दुष्काळी परिस्थिती असातानाही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली. या कार्यक्रमासाठी त्यांनी  मुंबईतील कलाकारांना निमंत्रित केले आहे. गुरुवारी पहाटे हा कार्यक्रम होणार आहे. याबरोबरच औरंगाबादच्या पश्चिम विधानसभा मतदार संघातही वर्चस्वाची राजकीय दिवाळी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्यासह इतर पक्षातील इच्छूक उमेदवारांकडून काही विशेष नागरिकांना दिवाळीच्या भेटवस्तु आणि शुभेच्छा पत्र दिल्या जात आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघ म्हणजे शिवसेना – भाजपच्या नेत्यांचा गड. या मतदार संघात व्यावसायिक दिवाळीला जोर आला असून येथील विद्यमान आमदार इम्तियाज जलील मात्र या सर्वांपासून दूर असल्याचे दिसून येत आहे.

 

शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खुष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विविध पक्षाचे नगरसेवक आणि  पदाधिकाऱ्यांमार्फत वार्डांमध्ये दिवाळी शुभेच्छांच्या होर्डिंगची जणू स्पर्धाच लागली आहे. दुसरीकडे काही राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत दिवाळीत राजकीय फटाकेही फोडताना दिसून येत आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेली ही दिवाळी औरंगाबादकरांसाठी सांस्कृतिक मेजवाणी बरोबरच राजकीय फटाक्यांची आतिषबाजीही  दिवाळी ठरत आहे.