छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इतिहास लिहिण्याची हीच संधी असून, औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका. त्यासाठी हवे तितके हिंदू पुढे येतील. कबर उखडून त्या जागी मुत्रालय बांधा, अशी घणाघाती टीका श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कट्टर हिंदुत्ववादी नेते आ. टी. राजासिंह ठाकूर यांनी येथे केली.
पिसादेवी येथे कै. द्रौपदाबाई नानाभाऊ काळे क्रीडा संकुलात शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी ७ वाजता टी. राजासिंह ठाकूर यांची जाहीर सभा झाली. या वेळी नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीच्या मराठवाडा संघटक प्रियांका लोणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्रीडा संकुल गर्दीने भरले होते. सभेत टी. राजासिंह पुढे म्हणाले, की औरंगजेबाची कबर ही आमच्या हिंदूंच्या छातीवर ठोकलेला खिळा आहे. जोपर्यंत ही कबर उखडून फेकणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. देवाभाऊ, तुम्ही ही कबर उखडून टाका, प्रत्येक हिंदू तुम्हाला मरेपर्यंत जिंकवत राहील. छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारणार्याची कबर आम्ही महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत सहन करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.













