औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या साथीमुळे महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात येतील, असा दावा शिवसेना नेते करीत आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या अंतर्गत सर्वेक्षणात फटका बसणार असल्याचे दिसून आल्याने सेना नेत्यांचा हा डाव असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. तरीही निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा असेल, असे म्हणत या प्रकरणातून हातही झटकले आहेत.
या आठवड्यात महानगरपालिकेच्या तारखांची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या साथीने आता महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी सत्ताधारी शिवसेना- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. स्थानिक चार आमदारांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांसह निवडणूक आयोगालाही दिले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे स्थानिक नेते पदाधिकारी निवडणुकीचा माहोल मधून कधीच बाहेर पडल्याचे दिसून येते. गेल्या आठवडाभरापासून शिवसेनेच्या अंतर्गत बैठकांचे सत्र थंड पडले आहे. त्याचबरोबर इच्छुकांचाही जोर कमी पडला आहे. कोरोना साथीने निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी खात्री आता शिवसेनेचे नेते देत आहेत. दुसरीकडे भाजपने मात्र निवडणुकीची तयारी सुरू ठेवल्याचे दिसते. उपमहापौर विजय औताडे यांनी शिवसेनेच्या मागणीवर टीका केली. विकास कामे झाली नसल्याने निवडणुकीत आपल्याला फटका बसेल असे दिसून आल्याने शिवसेना नेते कोरोनाचे कारण पुढे करीत असल्याचे ते म्हणाले. असे असले तरी निवडणुका घ्याव्यात की नाही हा निर्णय निवडणूक आयोगाचा राहील, असेही औताडे यांनी स्पष्ट केले. भाजपने मात्र निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. पक्षाच्या नियमित बैठका आणि इच्छुकांच्या अर्जांची छाननी सुरू असल्याचे ते म्हणाले