मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणार्या व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना व्यावहारिक मराठी येणे बंधनकारक आहे. यासाठी राज्य सरकारने ३ महिन्याची मुदतवाढ दिली होती. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत रिक्षा टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे. मात्र अनेक अमराठी रिक्षा-टॅक्सीचालक हा नियम सर्रासपणे धुडकावून लावतात. मराठी न येण्यावरून प्रवासी आणि चालकांमध्ये वादाचेही प्रसंग उद्भवले आहेत. त्यातून सरकारने मराठी भाषा बंधनकारक असून ती येणे गरजेचे आहे अशी भूमिका घेतली. यामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना ३ महिन्यांची मुदत देत त्यांना मराठीचे धडे शिकवण्याचीही तयारी दर्शवली. परंतु आजही अनेक चालक मुजोरपणे मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेत असल्याचं दिसून येते. त्यातूनच सरकारने या कायद्यात सुधारणा करून काही कठोर तरतुदी केल्या आहेत.
शासकीय अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये विविध प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या अॅप-आधारित मोटार कॅब आणि त्यांच्या परवाना व अधिकृततेशी संबंधित चालक तसेच परमिटधारकांसाठी व्यवहारिक मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे. मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाचा वाहन परवाना निलंबित अथवा कायमचा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नव्या नियम २२(३ए) नुसार अशा मोटार कॅबच्या अधिकृत चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे बंधनकारक राहणार आहे. अधिकृत चालकाकडे आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळून आल्यास नियमांचे पालन न केल्याबद्दल परवाना प्राधिकरणाला लेखी कारणे नोंदवून संबंधित चालकाविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित विभागाला जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत निलंबित करता येईल. त्यानंतरही संबंधित चालकाकडून नियमांचे सातत्याने पालन होत नसल्यास चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित परवाना कायमचा रद्द करता येईल.