मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. कर्जत-लोणावळा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेला तब्बल १६ गाड्या रद्द कराव्या लागल्या तर ९ लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दुसरीकडे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक रोडवर तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे वाहतूक टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, लोणावळा आणि कर्जतदरम्यान दक्षिण-पूर्व घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. रुळांवर माती आणि दगड आल्याने रेल्वे वाहतूक थांबवावी लागली. रेल्वे कर्मचार्यांकडून मलबा हटवण्याचे युद्धपातळीवर काम सुरू असले तरी सततच्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेससह एकूण १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अहमदाबाद-कोल्हापूर, अहमदाबाद-पुणे दुरांतो, चेन्नई-सीएसएमटी मेल, नांदेड-पनवेल एक्स्प्रेससह ९ गाड्या पर्यायी मार्गाने धावत आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक रोडवर डोंगरातून माती आणि दगड घसरल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक काही काळ रोखण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ , पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी तातडीने काम सुरू केले. यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी वाहनांची मोठी रांग लागली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली-खंडाळा घाट परिसरातही दरडी कोसळल्याने वाहतूक संथ झाली. घाटातील काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक नियंत्रित करण्यात आली. त्यामुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणार्या वाहनचालकांना अनेक तासांचा विलंब सहन करावा लागला.
दोन्ही महामार्ग पूर्णपणे ठप्प
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणार्या नागरिकांनी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई-पुणे प्रवास करू नका - एकनाथ शिंदे
मुंबई आणि पुण्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे - मुंबई मिसिंग लिंकवरील पुण्याहून मुंबईकडे येणार्या मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक आज पहाटे ४ वाजल्यापासून वळवण्यात आली आहे. सध्या रस्त्यावर पडलेली दरड दूर करून हा मार्ग पुन्हा सुरू करण्याचे शर्थीचे प्रयत्न एमएसआरडीसी आणि हायवे पोलीसांकडून सुरू आहेत. मात्र सातत्याने कोसळणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे यात काही अडचणी येत आहेत. यासोबतच मुंबई - पुणे रेल्वे मार्गावर ठाकूरवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणार्या काही रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून गरज असल्याशिवाय मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
प्रशासनाचं आवाहन
भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग () आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर प्रभावित झाली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक थांबवण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास पुढे ढकलावा आणि यंत्रणांकडून दिल्या जाणार्या वाहतूकविषयक सूचनांचे पालन करावे. जनहित आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करत आहे. मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरातील काही भाग आणि रस्त्यांवर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे; या भागात पुण्याहून मुंबईला जाणार्या पर्यायी मार्गांचाही समावेश होतो. त्यानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत खालील मार्ग बंद करण्यात आले आहेत.