लखनौ : आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आज गुरुवारी (१२ नोव्हेंबर २०२६) एक मोठे समीकरण उदयास आले आहे. आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर आझाद आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या आघाडीला सामाजिक परिवर्तन मोर्चा असे नाव देण्यात आले असून, चंद्रशेखर आझाद हे या आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील.
२६ नोव्हेंबरला लखनौमध्ये भव्य रॅली; सर्व ४०३ जागा लढवणार
लखनौ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार चंद्रशेखर आझाद यांनी या नव्या आघाडीची भूमिका स्पष्ट केली. आझाद यांच्या म्हणण्यानुसार, ङ्गङ्घहा केवळ तिसरा मोर्चा नसून सामाजिक बदलासाठी उभा राहिलेला पहिला मोर्चा आहे. सध्या यात दोन पक्ष असले तरी जसजसे शोषित, पीडित आणि वंचित घटक याच्याशी जोडले जातील, तसतसा हा मोर्चा अधिक मजबूत होत जाईल.ङ्घङ्घ या मोर्चाच्या माध्यमातून २६ नोव्हेंबर रोजी लखनौच्या रमाबाई आंबेडकर मैदानावर भव्य सत्ता परिवर्तन रॅली आयोजित केली जाणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ४०३ जागा लढवण्याची तयारी असल्याचे आझाद यांनी सांगितले. तसेच, भाजपला रोखण्यासाठी इतर समविचारी पक्षांनी सोबत यायचे असल्यास त्यांचे स्वागतच असेल, असेही त्यांनी नमूद केले.
राज्य सरकार आणि प्रस्थापित पक्षांवर टीकास्त्र
पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर आझाद यांनी विद्यमान भाजप सरकारसह पूर्वीच्या सरकारांवरही जोरदार टीका केली. अनेक पक्षांनी बहुजन समाजाच्या हक्कांची आश्वासने दिली, सरकारे बदलली, पण समाजाच्या पदरात काहीच पडले नाही. सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत आणि आवाज उठवणार्यांवर गुन्हे दाखल केले जातात, असा आरोप आझाद यांनी केला. राज्यातील चकमकींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आझाद म्हणाले की, हाथरस प्रकरण असो किंवा दलित व मागासवर्गीयांवरील अत्याचार, सध्याच्या राजवटीत कोणीही सुरक्षित नाही. संविधान आणि आरक्षणाशी छेडछाड झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपला तिसर्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणार: असदुद्दीन ओवैसी
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या आघाडीचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, उत्तर प्रदेशात भाजपला तिसर्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी सामाजिक परिवर्तन मोर्चा हा एक मजबूत पर्याय ठरेल. चंद्रशेखर आझाद यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करताना ओवैसी म्हणाले की, ङ्गङ्घआम्ही भूतकाळाचे नाही तर भविष्याचे राजकारण करणार आहोत. बेरोजगार तरुण, शेतकरी आणि मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा मोर्चा कटिबद्ध आहे.ङ्घङ्घ यावेळी ओवैसी यांनी समाजवादी पक्षावरही (सपा) निशाणा साधला. अल्पसंख्याकांची ९० टक्के मते मिळवूनही सपा भाजपचा पराभव करू शकली नाही आणि पुढेही करू शकणार नाही, अशी टीका ओवैसी यांनी केली.