भाजप आमदार अधिवेशन सोडून पक्षादेशाने मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये

Foto

औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना हिवाळी अधिवेशनापेक्षा मध्यप्रदेश, राजस्थानमधील विधानसभा निवडणूक अधिक महत्त्वाच्या वाटत आहे. सोमवारपासून (ता. १९) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली, मात्र सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार गैरहजर असल्याचे चित्र सभागृहात पाहाण्यास मिळाले. यासंबंधी काही आमदारांकडे विचारणा केली असता, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये असल्याचे त्यांनी सांगितेल. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात येत असून अधिवेशनातही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांजवार्ता ऑनलाईनटीमला सांगितले.

भाजप नेते कायम इलेक्शन मोडमध्ये

भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व असेल, नाही तर राज्यातील नेते, हे कायम इलेक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळते. कोणताही कार्यक्रम असला तरी भाजप नेत्यांची भाषणे ही प्रचारसभांमधील भाषणांसारखीच प्रचारकी असतात. पुढील पाच वर्षांत आम्ही काय करणार हे सांगण्यातच त्यांचा सर्वाधिक वेळ खर्च होतो. लोक त्यांना निवडून देतात आणि ते परत इलेक्शन मोडमध्ये जातात असे चित्र सध्या पाहावयाच मिळत आहे.  

निवडणुकीपुढे जनतेचे प्रश्नांना दुय्यम स्थान

राज्यात यंदा दुष्काळामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यामध्ये तर ऑक्टोबरमध्येच पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे अवघड झाले आहे. औरंगाबादमधील जायकवाडी धरणाची पाणीपातळी खालावली असून नगर आणि नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यासाठी जनतेला न्यायालयीन लढा लढावा लागत आहे. दुष्काळामुळे गाव-खेड्यांमध्ये जनतेच्या हाताला काम नाही. रोजगारासाठी त्यांच्यावर मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या जीवन मरणाचे एवढे गंभीर प्रश्न राज्यात असताना, अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांची सोडवणूक करण्याऐवजी लोकप्रतिनिधी पक्षाला निवडणूक जिंकून देण्यासाठी अधिवेशन सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन बसले असल्याचे समोर आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या मराठवाड्यातील एका आमदार महोदयांशी सांजवार्ता ऑनलाईनने संपर्क केला असता नाव न छापण्याच्या अटीवर ते म्हणाले, ‘पक्षाचा आदेश असल्यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून मी मध्यप्रदेशात आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्य आणि नेत्यांना श्रद्धांजली वाहिले जाते. त्या दिवशी कामकाज होत नाही. त्यानंतर ईदची सुटी आहे. त्यामुळे मी पुढील दोन-तीन दिवसानंतर अधिवेशनला हजर राहाणार आहे. तेव्हा जनतेचे प्रश्न सभागृहात नक्की मांडू.

भाजपच्या आमदारांना पक्षाने मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील विविध मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार करण्याचे आदेश दिलेले आहेत. पक्षादेश आल्यानंतर भाजपच्या आमदारांना दुसरा कोणताही पर्याय राहात नाही, मग त्यांच्या गृहराज्यात कितीही महत्त्वाचा प्रश्न असला तरी त्यांच्यासाठी निवडणूक ही सर्वात महत्त्वाची, असेच सध्या पाहायला मिळत आहे. 

अधिवेशनाचा कालावधी आठ दिवसांचा

सोमवारपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्त आठ दिवसांचा आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ पुरेसा नसल्याचे विरोधीपक्ष नेत्यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. एकीकडे विरोधीपक्ष अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत आहे आणि सत्ताधारी आहे त्या आठ दिवसांपैकी पहिले दोन-तीन दिवस गैरहजर राहात आहेत, त्यामुळे जनेत्या प्रश्नांची त्यांना किती काळजी आहे, हा प्रश्नच आहे. 

कोणत्या राज्यात केव्हा निवडणूक

मध्यप्रेदश आणि मिझोराम या राज्यांची विधानसभा निवडणूक २८ नोव्हेंबर रोजी आहे. तर, राजस्थान आणि तेलंगणा राज्यात ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याशिवाय छत्तीसगडसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज (ता. २०) सुरु आहे. या पाचही विधानसभा निवडणुकीचा निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक ही आगामी लोकसभेची सेमीफायनल समजली जात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker