दिल्लीचे नाव बदलण्याची भाजपा खासदाराची अमित शाह यांच्याकडे मागणी...

Foto
नवी दिल्ली : केंद्र आणि विविध राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून अनेक शहर, जिल्हे आणि संस्थांची नावे बदलण्यात आलेली आहेत. आता थेट राजधानी दिल्लीचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी भाजपा खासदारांनी केली आहे. भाजपाचे दिल्लीतील खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले असून दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ ठेवावे, अशी मागणी केली आहे.

दिल्लीचा संबंध पांडवाशी आहे, असे म्हणत प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाचे नाव इंद्रप्रस्थ जंक्शन असे करावे. तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव इंद्रप्रस्थ विमानतळ करावे, अशीही सूचना त्यांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खंडेलवाल म्हणाले, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की, दिल्लीचा इतिहास थेट पांडवांशी जोडलेला आहे. म्हणूनच दिल्लीची गौरवशाली संस्कृती, सभ्यता, वारसा आणि परंपरा इंद्रप्रस्थ या नावाशी जोडली गेली आहे. जर दिल्लीचे नामकरण इंद्रप्रस्थ केल्यास निश्चितच आपल्या ऐतिहासिक परंपरांचे पुनरुज्जीवन होईल. तसेच दिल्लीत पांडवांचे पुतळेही उभारावेत, जेणेकरून तरुण पिढीला त्याबद्दल जाणून घेता येईल.

आंध्रच्या व्यंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीत ९ भाविकांचा मृत्यू; चेंगराचेंगरीमुळे पुन्हा एकदा दक्षिण भारत हादरला!
खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी पुढे सांगितले की, भारताच्या सांस्कृतिक वारशांमध्ये दिल्लीचे विशेष स्थान आहे. हे केवळ एक महानगर नाही तर भारताच्या संस्कृतीचे केंद्र आहे. इतिहास साक्षीदार आहे की, महाभारत काळात पांडवांनी यमुनेच्या काठावर त्यांची राजधानी इंद्रप्रस्थ नगरीची स्थापना केली होती. ते एक समृद्ध आणि नितीमत्तेवर चालणारे नगर होते.

खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्याप्रमाणेच विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) रविवारी दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांना पत्र लिहून दिल्लीच्या प्राचीन इतिहासाशी नाळ जोडण्यासाठी इंद्रप्रस्थ करण्याची मागणी केली होती. व्हीएचपी दिल्लीचे प्रांत सचिव सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले, दिल्लीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शहराचे नाव बदलले गेले पाहिजे.