भाजपचा पदाधिकारी निघाला सोने तस्कर, ५ कोटींच्या सोन्यासह मुंबई विमानतळावर अटक

Foto
मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  डीआरआयने सोने तस्करीविरोधात एक अत्यंत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हायप्रोफाईल सोने तस्करी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या पदाधिकार्‍यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या पथकाला मुंबई विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकार्‍यांनी सापळा रचून शनिवारी मध्यरात्री सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास विमानतळ परिसरात ही धडक कारवाई केली. संशयास्पद हालचालींवरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या झडतीमध्ये ५ कोटींहून अधिक किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींमध्ये अजित आचरेकर नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचरेकर हा भाजप कामगार संघटनेचा चिटणीस आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अजित आचरेकर याने जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर आचरेकर यांच्यावर कामगार संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍याचा थेट सोने तस्करीत सहभाग समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून टीका केली जात आहे. याबाबत भाजपकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय
डीआरआयच्या प्राथमिक तपासानुसार, जप्त करण्यात आलेले सोने हे परदेशातून आणले गेले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का? याचा तपास आता यंत्रणा करत आहेत. या प्रकरणात अजित आचरेकर याच्यासह इतर ४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या तस्करीच्या मागे आणखी कुणी बडे मासे आहेत का? या दिशेने डीआरआयने आपला तपास सुरू केला आहे. एका सोने रॅकेट प्रकरणात अशाप्रकारे भाजपचा पदाधिकारी आढळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांचा गंभीर आरोप
या अटक प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी एक फोटो शेअर करत भाजपवर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वागणे, बोलणे, डोलणे आणि चालणे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कधीच शोभणारे नव्हते. कोकणात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पैशाचा अतिरेकी वापर केला. जिल्हा बँक निवडणूकही याच पद्धतीने ताब्यात घेतली. यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर काल रात्री मिळाले.