मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घेतलेली भेट. शिवसेनेच्या (शिंदे) मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर टाकलेला बहिष्कार आणि सत्ताधारी पक्षच एकमेकांचे पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देत असल्यामुळे महायुतीत काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी एकमेकांचे घोटाळे किंवा गैरव्यवहार जाणीवपूर्वक बाहेर काढले जात आहेत, अशीही टूम उठली होती. सत्ता प्राप्तीनंतर भाजपा मित्रपक्षांना गिळंकृत करतो, अशी राजकारणात नेहमीच चर्चा होत असते. असाच प्रश्न शिवसेनेच्या (शिंदे) यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी दिलेले उत्तर पाहा.
एका वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत उदय सामंत यांना महायुतीमधील सध्याच्या राजकारणावर बरेच प्रश्न विचारण्यात आले. यात एक प्रश्न भाजपाबद्दल होता. भाजपा मित्रपक्षांना हळूहळू गिळंकृत करतो. आधीची शिवसेना फुटली आता शिंदेंच्या शिवसेनेची वेळ आली आहे का? असा प्रश्न यावेळी उदय सामंत यांना विचारण्यात आला.
या प्रश्नावर उत्तर देत असताना मंत्री उदय सामंत म्हणाले, ङ्गङ्घकदाचित ही अफवा असू शकतो. पण ही अफवा सत्यात उतरू नये. याची दक्षता घेतली पाहिजे.फफ ही दक्षता भाजपाने घेतली पाहीजे का? असा पुढचा प्रश्न उदय सामंत यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, आमच्या बाबतीत असे घडलेले नाही. त्यामुळे ती अफवा वाटते.
शिंदे आणि फडणवीस यांच्यातील संबंध कसे?
उदय सामंत यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधाबद्दलही भाष्य केले. दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीच्या पलीकडचे संबंध आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष चालवत असताना त्यांच्या प्रतिमेला डाग लागेल, असे कुणीही वागता कामा नये.
एकनाथ शिंदे एनडीएतील मोठे नेते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट तक्रार करण्यासाठी घेतली होती का? या प्रश्नावरही उदय सामंत यांनी उत्तर दिले. बिहारमध्ये ज्याप्रमाणे नितीश कुमार आहेत. त्याप्रमाणेच एकनाथ शिंदेही एनडीएतील मोठे नेते आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर एकनाथ शिंदे तिसऱ्या क्रमाकांचे नेते आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले ते बिहारच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर गेले होते. देशाचे नेते म्हणून ते अमित शाह यांना भेटू शकतात, असे उदय सामंत म्हणाले.